India Vs. England: कोहली फलंदाजीत 'विराट', पण नेतृत्त्वाचं काय?

आम्ही आता परदेशातही तिरंगा फडकवू, असं काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे गुरुजी रवी शास्त्री असं म्हणाले होते. पण, परवा इंग्लंडमध्ये आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेत काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं.

By प्रसाद लाड | Published: September 4, 2018 11:28 AM2018-09-04T11:28:55+5:302018-09-04T11:29:36+5:30

whatsapp join usJoin us
India vs. England: Virat Kohli star in personal performance, but what about leadership? | India Vs. England: कोहली फलंदाजीत 'विराट', पण नेतृत्त्वाचं काय?

India Vs. England: कोहली फलंदाजीत 'विराट', पण नेतृत्त्वाचं काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आम्ही आता परदेशातही तिरंगा फडकवू, असं काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे गुरुजी रवी शास्त्री असं म्हणाले होते. पण, परवा इंग्लंडमध्ये आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेत काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. आम्हाला सराव करायला संधी मिळाली नाही, या सबबीच्या जोरावर त्यांनी आफ्रिकेतील पराभवातून पळवाट काढली होती. पण इंग्लंडमध्ये त्यांच्यातला आक्रमकपणा उघडा पडला. संघ व्यवस्थापनेच्या सूचनेनुसार मर्यादित षटकांच्या सामन्यांनी दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर कसोटी मालिकेसाठी बराच अवधीही दिला होता. पण निकाल काय लागला? विराट कोहलीनं फलंदाजीत सातत्य दाखवलंय, पण तो नेता म्हणून अजून परिपक्व झाल्याचं या मालिकेतही दिसलं नाही.

पहिल्या कसोटीपासून कोहलीच्या चुका होत गेल्या आणि त्याचा परिपाक मालिका गमावण्यात झाला. पहिल्या कसोटीसाठी त्याने चेतेश्वर पुजारासारख्या कसोटीसाठी नावाजलेल्या फलंदाजाला संघात स्थान दिले नव्हते. त्याच पुजाराने चौथ्या सामन्यात शतक झळकावत संघाची लाज राखली. मालिकेत बऱ्याच चुका झाल्या, पण आपण आता चौथ्या कसोटीचीच गोष्ट करूया.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यांची 1 बाद 1 ते 6 बाद 86 अशी दयनीय अवस्था झाली होती. सामना जिंकण्याची आणि मालिकेत बरोबरी करण्याची ही पहिली संधी होती. 6 बाद 86 या धावसंख्येवरून भारताने इंग्लंडला जास्तीत जास्त दीडशे धावांमध्ये तंबूत धाडायला हवे होते. पण त्यानंतर सॅम कुरन आणि मोईन अली यांनी दमदार भागीदारी रचली आणि इंग्लंडने 246 धावा रचल्या. भारताच्या संघाने इंग्लंडवर वचक ठेवण्याची आणि धावसंख्येला वेसण घालण्याची सुवर्णसंधी गमावली. या गोष्टीचे कारण कोहलीच्या नेतृत्वामध्ये आहे. कारण जेव्हा इंग्लंडची ससेहोलपट झाली होती. तेव्हा त्यांच्या अन्य चार फलंदाजांना बाद करण्यासाठी कोहलीकडे रणनीती नव्हती. भारतीय संघातील फक्त एकच गोलंदाज रणनीतीनुसार गोलंदाजी करत होता आणि तो म्हणजे मोहम्मद शमी. पण कोहलीने या सामन्यात त्याच्यावरच जास्त अन्याय केला. 

शमीसारखा वेगवान आणि स्विंग करणारा गोलंदाज भारताला ऐंशीच्या दशकात भेटला असता तर त्या संघाची कामगिरी अजून बहारदार होऊ शकली असती. पण आता त्याच्यासारखा गोलंदाज संघात आहे, पण त्याचा योग्य वापर कोहली करताना दिसत नाही. पहिल्या डावात शमीकडून डावाचे सारथ्य करायला हवे होते, पण कोहलीने शमीला चौथ्या क्रमांकावर गोलंदाजीला आणले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताकडे नवीन चेंडू होता. पण कोहलीने डावाच्या सुरुवातीची षटके दिली ती आर. अश्विनला. दुसऱ्यांदा हा शमीवर झालेला अन्याय होता. त्यानंतर हाच चेंडू जेव्हा जुना झाला तेव्हा कोहली हार्दिक पंड्या आणि अश्विन यांना गोलंदाजी देत होता. जुना चेंडू हा शमी रीव्हर्स स्विंग करू शकतो, हे कोहलीला माहिती नसावे.

भारतीय संघातील बहुतेक फलंदाज हे ट्वेन्टी-20 च्या मुशीत वाढलेले आहेत. रिषभ पंत आणि पंड्या यांच्याकडे चांगला बचाव नाही, पण ते मोठे फटके मारू शकतात. त्यामुळे त्यांना दडपण घेऊन थांबून खेळायला लावणे चुकीचेच ठरते. त्यांच्या गुणवत्तेचा वापर कसा करायला हवा, हे कोहलीला जमले नाही. इंग्लंडच्या संघात जसा जोस बटलर फलंदाजी करत होता, तशी फलंदाजी या दोघांकडून करवून घ्यायला हवी होती. पण तसे काही दिसले नाही.

पहिल्या डावात फलंदाजांच्या चुका आपल्याला भोवल्या. साधा कॉमन सेन्स त्यांच्याकडे नव्हता. पुजारा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता. चेंडू त्याच्या बॅटवर चांगला येत होता. संघाचा धावफलक तो हलता ठेवत होता. यावेळी त्याला साथ देणे महत्त्वाचे होते. पण पंतला 22 चेंडू खेळून एकही धाव करता आली नाही. पंड्या तर आपली विकेट बहाल करून तंबूत परतला. अश्विन हा अँडी फ्लॉवरच्या थाटात चक्क रिव्हर्स स्विप खेळायला गेला आणि आपली विकेट आंदण देऊन आला. या तिघांनी जर पुजाराला चांगली साथ दिली असती तर भारताला मोठी आघाडी घेऊन सामना जिंकण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकता आले असते. पण या तिघांना कोणती अवदसा आठवली, तेच जाणोत. अखेर पुजाराने तळाच्या दोन फलंदाजांना साथीला घेत आपले शतक झळकावले, संघाच्या धावसंख्येत पाऊणशे धावांची भर घातली आणि इंग्लंडवर आघाडी मिळवून दिली.
इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने अडचणीत आणले होते. पण पुन्हा एकदा दिशाहीन नेतृत्वामुळे सॅम कुरन आणि जोस बटलर भारताकडून सामना हिरावून घेऊन गेले. एकेकाळी इंग्लंडचा संघ दोनशे धावाही गाठणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी झळकावल्या 271 धावा. जेव्हा इंग्लंडने अडीचशे धावांचा पल्ला गाठला तेव्हाच भारताचा पराभव लिहिला गेला होता. त्याला कारण होती ती भारताची फलंदाजी.

मोईन अलीसारखा साधा फिरकीपटू सामन्यात 9 बळी मिळवतो, त्यावरून तुमची फलंदाजी किती कमकुवत आहे, हे कळून चुकते. भारतामधल्या आखाड्या खेळपट्ट्यांवर तुमच्याकडून धावा होतात. मग त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे भारतीय फलंदाजांना जमले का नाही, हीच मोठी गोम आहे. खेळपट्टी संथ झाली होती. चेंडू वर-खाली होत होते. त्यावेळी बॅट कितपत खाली आणायची, हे फलंदाजांना माहिती असायला हवं. पण त्यांना ते जमलं नाही. अलीसारख्या फिरकीपटूला विकेट बहाल करत भारतीयांनी आपला पराभव ओढवून घेतला.

जेव्हा सामना किंवा मालिका भारत जिंकत असतो, तेव्हा कोहलीच्या नेतृत्त्वाचे कौतुक होते, असे म्हटले जाते. भारत पराभूत झाल्यावर कोहलीच्या कप्तानीवर टीका होते, असे काही जण म्हणतीलही. पण एक गोष्ट खुल्या मनाने आणि डोकं ताळ्यावर ठेवून आपण स्वीकारायला हवी आणि ती गोष्ट म्हणजे कोहलीकडे नेतृत्वगुण नाही. जेव्हा संघ अडचणीत येतो, तेव्हा कर्णधाराने खेळाडूंना धीर द्यायला असतो. इथे तर कोहली सर्वात पहिल्यांदा निराश झालेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत असते. तुमचा नेताच असा असेल तर कार्यकर्ते सत्ता मिळवून देऊ शकत नाहीत, तसेच कोहलीच्या बाबतीत आहे. डीआरएसबाबत यष्टीरक्षकाला पहिले विचारायचे असते, एवढी साधी गोष्ट कोहलीला कळत नाही. कोहली धवनला एवढी संधी का देतो, याचे उत्तर कुणाकडे आहे का? धवनकडून धावा होत नसताना त्याच्या जागी पंतला पाठवून आक्रमण करायचे आणि करुण नायरसारख्या त्रिशतकवीर खेळाडूला संधी द्यायची, हा विचार कोहली करत नाही. किंवा करुण नायरकडे सलामीचा पर्याय म्हणून का पाहत नाही, हेदेखील अनाकलनीय आहे. कुलदीप यादवला खेळवून अनुभवी रवींद्र जडेजाचा पर्यटक का केला जातो, हेदेखील समजत नाही. एकंदरीत नेतृत्त्व करण्यासाठी कोहलीला स्वतःवर बरंच काम करावं लागणार आहे.

Web Title: India vs. England: Virat Kohli star in personal performance, but what about leadership?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.