दुबई : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. पण तरीही भारताचा कर्णधार विराट कोहली एक नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. या दौऱ्यात आतापर्यंत कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही, पण तरीही तो ' हा ' विक्रम नक्कीच आपल्या नावावर करू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने अनुक्रमे 75, 45 आणि 71 धावा केल्या. या कामगिरीमुळे कोहलीला फक्त दोन अंक मिळाले आणि त्याने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली ज्यापद्धतीने क्लीन बोल्ड झाला ते पाहता त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.
सध्याच्या घडीला आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीच्या खात्यात 911 गुण आहेत. पण जर कोहलीने 8 गुणांची कमाई केली तर त्याच्या नावावर नवीन विक्रम होऊ शकतो. कारण ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांनी 918 गुण कमावले होते. त्यामुळे कोहलीने जर आठ गुण पटकावले तर कोहली सर्वाधिक गुणांची कमाई करणारा फलंदाज ठरू शकतो.