ठळक मुद्देकुंबळे यांच्या कालावधीमध्ये मात्र भारताची कामगिरी सर्वोत्तम अशीच झाली होती. कुंबळे यांच्या काळात भारताने 75 टक्के सामने जिंकले होते.
मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडमधल्या मालिका पराभवानंतर आता संघावर टीका होते आहे. काही जणांनी तर थेट मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. शास्त्री हटवा, अशी मागणी जोर धरते आहे. पण खरेच शास्त्रींना या पराभवानंतर हटवायला हवे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांचे भारतासाठी असलेले संचालक आणि प्रशिक्षक म्हणून योगदान पाहणे गरजेचे आहे.
शास्त्री भारतीय संघामध्ये मार्गदर्शक म्हणून आले ते 2014च्या इंग्लंड दौऱ्यातच. भारतीय संघाने कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ला होता. डंकन फ्लेचर तेव्हा भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. पण संघाला अजून एका वरिष्ठ व्यक्तीची गरज आहे, हे पाहून शास्त्री यांची निवड संचालकपदी करण्यात आली. शाळा किंवा महाविद्यालयाचा कारभार मुख्यधापकांनी नाही तर संचालकांनी पाहावा, अशीच काहीशी ही गोष्ट होती. फ्लेचर यांचे अधिकार कमी करण्यात आले होते.
शास्त्री यांनी संघातील आपली जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका जिंकली. निवड समिती आणि बीसीसीआय यांचा त्यांच्यावर विश्वास वाढला. त्यामुळे कालांतराने शास्त्री यांच्या अधिकारांमध्ये वाढ होत गेली. फ्लेचर यांची हकालपट्टी झाली. शास्त्री संघाचे सर्वेसर्वा होते. पण फ्लेचर संघाबरोबर असताना आणि नसताना कामगिरी कशी झाली, ते पाहुया.
फ्लेचर आणि शास्त्री एकत्र होते तेव्हा ऑगस्ट 2014 ते मार्च 2015 या कालावधीमध्ये भारताने 17 एकदिवसीय सामने जिंकले होते, तर सहा सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. या कालखंडात भारताला एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. दोन कसोटी सामने आपण हरलो होतो, तर दोन सामने अनिर्णित राहीले होते. एकमेव ट्वेन्टी-20 सामन्यात भारत पराभूत झाला होता.
फ्लेचर यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर फक्त शास्त्री यांच्याकडे संघाची सुत्रे होती. एप्रिल 2015-16 या कालावधीमध्ये भारताने सात कसोटी सामने जिंकले होते, तर नऊ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. पण भारताने पाच कसोटी सामने जिंकले होते, तर एका सामन्यात पराभव झाला होता. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला होता. सहा ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये भारत जिंकला होता, तर दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
शास्त्री यांची संचालकपदाची मुदत संपली आणि त्यानंतर बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचे ठरवले. भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळात भारताची कामगिरी फ्लेचर आणि शास्त्री यांच्यापेक्षाही सरस झाली. कुंबळे यांनी भारताचा जून 2016-17 या कालावधीत प्रशिक्षकपदाचा पदाभार सांभाळला. या कालावधीमध्ये भारताने 12 कसोटी सामने जिंकले तर फक्त एक सामना गमावला, एक चार सामने अनिर्णीत राहीले होते. एकदिवसीय लढतींमध्ये भारताना 14 विजय मिळवले होते, तर सहा सामन्यांत पराभव झाला होता. ट्वेन्टी-20 लढतींमध्ये भारताने चार विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांत पराभव झाला होता.
फ्लेचर, शास्त्री आणि कुंबळे यांच्या कामगिरीवर लक्ष दिले तर फ्लेचर आणि शास्त्री यांची एकत्रित कामगिरी चांगली होती. फक्त शास्त्री जेव्हा संघाच्या मुख्यपदी होते तेव्हा भारताची कामगिरी थोडीशी ढासळली होती. पण कुंबळे यांच्या कालावधीमध्ये मात्र भारताची कामगिरी सर्वोत्तम अशीच झाली होती. कुंबळे यांच्या काळात भारताने 75 टक्के सामने जिंकले होते.
कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी चांगली होत होती. पण तरीही त्यांना प्रशिक्षकपदी कायम का ठेवण्यात आले नाही, याचं उत्तर तुम्ही सारे जाणताच. कुंबळेंना नारळ दिला आणि शास्त्री यांनी पुन्हा एकदा भारतीय संघात मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवेश केला. त्यानंतर कुंबळे यांच्या तुलनेत शास्त्री यांच्या कार्यकाळात संघाची कामगिरी काही अंशी खालावली. भारताने कसोटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्या, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र 1-2 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंग्लंडमध्येही आता मालिका भारताने गमावली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका सोडल्यास सर्व मालिका भारताने जिंकल्या.
कुंबळे आणि शास्त्री यांच्यामध्ये बरीच तफावत पाहायला मिळाली. त्यामुळेच शास्त्री यांच्यावर टीका व्हायला सुरु झाली आहे. कुंबळे यांनी कधीही मोठी विधाने केली नाहीत, दुसरीकडे शास्त्री यांनी बरीच बडबड केली. संघात अहंकार भरला, मग्रुरी आली. कोहली-शास्त्री यांच्या जोडगोळीची दादागिरी वाढली. ही दादागिरी चाहत्यांनी पचली आणि पटलीही नाही. त्यामुळेच सध्या शास्त्री यांच्यावर चाहते नाराज झाले आहेत. दुसरीकडे कुंबळे आणि राहुल द्रविड यांच्यासारखे पर्याय बीसीसीआयसाठी खुले आहेत. सध्यातरी विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदावर कायम राहतील. त्यांची हकालपट्टी वैगेरे बीसीसीआय करणार नाही. पण शास्त्री यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. एकेकाळी डोक्यावर घेणारे चाहते आपल्यावर नाराज का आहेत, हे शास्त्री यांनी समजून घ्यायला हवे, एवढे मात्र नक्की.
Web Title: India vs England: wake up call for Shastri Guruji
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.