India vs England Warm-up match - टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्याने करणार होती. मात्र गुवाहाटीतील सामन्यापूर्वी मुसळधार पावसामुळे दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या सामन्यात नाणेफेकिनंतर अद्याप एकही चेंडू टाकता आला नाही. आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, की जर संध्याकाळी ७.३० पर्यंत गुवाहाटीच्या मैदानावर खेळण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही, तर सामना रद्द केला जाऊ शकतो. ग्राउंड स्टाफला पाऊस थांबल्यानंतर मैदान तयार करण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडिया आणि इंग्लंड संघांचे खेळाडू आता मैदानातून हॉटेलमध्ये परतले आहेत. त्यामुळे संध्याकाळी ७.३० पर्यंत सामना सुरू झाला नाही, तर तो रद्द होईल. गुवाहाटीत जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर त्याचे हलक्या पावसात रूपांतर झाले. त्यामुळे सामना होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. दरम्यान, तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सराव सामन्यातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे दुसरा सराव सामनाही अद्याप सुरू झालेला नाही. काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. काल झालेल्या अन्य दोन सराव सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर आणि न्यूझीलंडने पाकिस्तानवर सहज विजय मिळवले. वर्ल्ड कप साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.