India Tour of England : टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरू होण्यास आता १ महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असताना सलामीवीर शुबमन गिल याला दुखापतीमुळे दौऱ्याला मुकावे लागणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत गिल हा रोहित शर्मासोबत सलामीला खेळणार होता, परंतु त्याच्या दुखापतीमुळे विराट कोहली अँड टीमची डोकेदुखी वाढवली आहे. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल हे दोन पर्याय विराट समोर असताना श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ अन् देवदत्त पडिक्कल यांच्यासाठी टीम व्यवस्थापनानं निवड समितीनं विचारणा केली आहे. पण, संघात दोन अनुभवी खेळाडू असताना या मागणीनं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
On this day in 2019: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, कुमार संगकाराचा मोडला विक्रम अन् सचिन तेंडुलकरशी बरोबरी!
इंग्रजी वृत्तपत्रांच्या माहितीनुसार संघ व्यवस्थापन लोकेश राहुलचा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून विचार करत आहे. मयांक व लोकेश यांच्यासह बंगालच्या अभिमन्यू इस्वरन हाही संघासोबत राखीव सलामीवीर म्हणून आहे. पण, अनुनभवी खेळाडूला खेळवून टीम इंडिया कोणताच धोका पत्करू शकण्याच्या तयारीत नाही.
पण, संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी न निवडलेल्या खेळाडूला बोलवून संघात असलेल्या खेळाडूंचा अपमान करत असल्याची टीका कपिल देव यांनी केली. ते म्हणाले,''याची गरज आहे, असे मला वाटत नाही. निवड समिती सदस्यांचा जरा तरी आदर करा. त्यांनी या दौऱ्यासाठी संघ निवडला आणि शास्त्री व कोहली यांच्या सल्ल्याशिवाय ही संघ निवड नक्कीच झाली नसावी. तुमच्याकडे लोकेश राहुल व मयांक अग्रवाल हे उत्तम सलामीवीर असताना तिसऱ्या पर्यायाची खरंच गरज आहे का? मला हे चुकीचे वाटतेय.''
''मला हे काही पटत नाहीए. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात सालमीवीर आहेत, त्यापैकी एक नक्की खेळेल. अन्यथा हा त्या खेळाडूंचा अपमान असेल,''असेही १९८३च्या वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले,''जर कर्णधार व प्रशिक्षक संघ निवड करत असतील तर मग निवड समितीची गरज काय? कर्णधार व संघ व्यवस्थापक यांनी त्यांची मत मांडायला हरकत नाही, परंतु नविड समितिच्या निर्णयात हस्तक्षेप नसावा. मग निवड समितीची गरजच नाही. यामुळे निवड समिती सदस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. विराट व रवी यांनी खेळाडूंच्या पाठिशी उभं राहायला हवं, त्यांचे खच्चीकरण करायला नको.''