लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना 30 ऑगस्टला रंगणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण चौथ्या सामन्याची तयारी करताना त्यांना इंग्लंडच्या एका खेळाडूच्या कामगिरीवर खास लक्ष ठेवावे लागणार आहे, त्याचबरोबर त्याला कसे रोखता येईल, याची रणनीतीही त्यांना आखावी लागेल. कारण इंग्लंडचा एक खेळाडू या सामन्यात विश्वविक्रम रचण्यासाठी सज्ज आहे. आता या इंग्लंडच्या खेळाडूला विश्वविक्रम करण्यापासून कोहलीसेना रोखते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅग्राने आतापर्यंत 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 बळी मिळवले आहेत. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विश्वविक्रम मॅग्रा याच्या नावावर आहे. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला हा मॅग्रा याला मागे टाकण्याची नामी संधी आहे. कारण भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात जर अँडरसनने सात बळी मिळवले तर हा विश्वविक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो.
याबाबत मॅग्रा म्हणाला की, " मी अँडरसनचा एक गोलंदाज म्हणून नेहमीच सन्मान करत आलो आहे. त्याने जर नवीन विश्वविक्रम रचला तर मला त्याचा आनंद होईल. पण अँडरसन किती बळी मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण अँडरसनचा विश्वविक्रम कोणताही वेगवान गोलंदाज मोडेल, असे मला वाटत नाही. "