नवी दिल्ली - स्मृती मंधानाने केलेल्या तुफानी ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडला ८ विकेट्सनी पराभूत केले. डर्बी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी १४३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय महिला संघाने स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या खेळींच्या जोरावर दोन विकेट्सच्या मोबदल्यात २० चेंडू राखून पार केले. हरमनप्रीतने २९ धावांची खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र त्यांच्या विकेट्स सातत्याने पडत गेल्या. इंग्लंडचा अर्धा संघ ५४ धावांमध्ये माघारी परतला. त्यामुळे इंग्लिश संघाल १०० धावाही काढता येणार नाहीत असे वाटत होते. मात्र फ्रेया कॅम्प आणि माइया बाउचियर यांनी सहाव्या विकेटसाठी ६५ धावा जोडत इंग्लंडचा डाव सावरला. फ्रेयाने नाबाद ५१ धावाची खेळी केली. इंग्लंडने २० षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात १४२ धावा करत भारतासमोर १४३ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून स्नेह राणाने ३ तर दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंह यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. त्यानंतर शेफाली २० धावा काढून बाद झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेली दयालन हेमलता ९ धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी अभेद्य ६९ धावांची भागीदारी करत भारताला २० चेंडू राखून आधीच विजय मिळवून दिला.