पुणे : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या लढतीत मोठ्या फरकाने स्वीकाराव्या लागलेल्या पराभवातून बोध घेत टीम इंडिया रविवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व निर्णायक वन-डे लढतीत बदललेल्या निर्धाराने व नव्या रणनीतीसह देशबांधवांच्या होळीमध्ये विजयाच्या रंगाची भर घालण्यास उत्सुक आहे.
फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने गेल्या लढतीत २० षटकार लगावत ३३७ धावांचे कठीण लक्ष्य सहज गाठले. खराब फॉर्मात असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव व कृणाल पांड्या यांनी इंग्लंडचे काम सोपे केले.भारतीय कर्णधार विराट कोहलीला रवींद्र जडेजाची एवढी उणीव कधीच भासली नसेल. जॉनी बेयरस्टो व बेन स्टोक्स यांनी भारतीय फिरकीपटूंविरुद्ध मनाप्रमाणे धावा चोपल्या.
गोलंदाजीमध्ये कुलदीपविरुद्ध ८ षटकार लगावले गेले. अन्य कुठल्या भारतीय गोलंदाजाच्या तुलनेत हे सर्वाधिक षटकार आहेत. त्याने दुसऱ्या लढतीत ८४, तर पहिल्या लढतीत ६४ धावा दिल्या. कृणाल पांड्याने ६ षटकांत १२ च्या सरासरीने ७२ धावा बहाल केल्या. त्यामुळे निर्णायक लढतीत या दोघांच्या स्थानी लेग स्पिनर युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. चहल सर्वोत्तम फॉर्मात नसला तरी कोहलीकडे दुसऱ्या कुठला पर्याय नाही.
कृणाल फलंदाजीच्या जोरावर संघात स्थान मिळवू शकतो; पण निराशाजनक गोलंदाजीमुळे तो दीर्घकालीन पर्याय नसल्याचे स्पष्ट होते.फलंदाजीमध्ये ३३६ ही धावसंख्या निराशाजनक नव्हती; पण फलंदाजांच्या शैलीमध्ये बदलाची गरज आहे. भारतीय संघ अखेरच्या १५ षटकांत झटपट धावा काढण्यावर विश्वास ठेवतो आणि ही संकल्पना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रुजविली आहे. अनेकदा ही रणनीती यशस्वी ठरते; पण विश्व चॅम्पियन इंग्लंडने सिद्ध केले की, अनुकूल खेळपट्टीवर सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्याची रणनीती योग्य आहे.
त्यानंतर ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्यासारख्या फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याची संधी मिळते. कर्णधार कोहलीने दोन्ही लढतींमध्ये अर्धशतके झळकावली; पण त्याच्याकडून शतकाची आशा आहे. कोहलीने ऑगस्ट २०१९ पासून शतक झळकवलेले नाही.वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत य़ॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजनला संधी मिळू शकते. तसे शार्दूल ठाकूर फॉर्मात आहे; पण त्याला विश्रांती देण्यात आली तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. दुसऱ्या बाजूचा विचार करता, विजयामुळे इंग्लंडचे मनोधैर्य उंचावलेले आहे आणि बेन स्टोक्सला सूर गवसणे दिलासा देणारी बाब आहे.
‘मी विक्रमासाठी खेळत नाही. मी माझ्या कारकिर्दीत कधीच शतकासाठी खेळलो नाही. त्यामुळे मी एवढ्या कमी कालावधीत एवढी शतके झळकावू शकलो. संघाच्या विजयात योगदान देणे महत्त्वाचे आहे. शतकानंतरही संघ विजयी ठरला नाही तर ते शतक काय कामाचे?’-विराट कोहली
प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), के. एल. राहुल (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर.
इंग्लंड : इयोन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, मॅट पार्किंसन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टॉपले, मार्क वुड, जॅक बॉल, क्रिस जॉर्डन, डेविड मलान.