टारुबा (त्रिनिदाद) : कर्णधार यश धूलसह एकूण सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कशीबशी संघाची जुळवाजुळव करावी लागल्यानंतरही जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा १७४ धावांनी फडशा पाडत दणदणीत विजय मिळवला. संयमी, परंतु दमदार अर्धशतकी खेळी केलेला हरनूर सिंग सामनावीर ठरला.
सामन्याच्या काही तासांपूर्वी कर्णधार यश धूलसह एकूण सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. यामुळे त्यांना विलगीकरणात जावे लागल्याने आयर्लंडविरुद्ध संघ उतरविण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. यशच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. ही संधी योग्यपणे साधताना सिंधूने शानदार नेतृत्व केले. ब्रायन लारा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून आयर्लंडने भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (७९), हरनूर (८८) आणि राज बावा (४२) यांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ५ बाद ३०७ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव ३९ षटकांत केवळ १३३ धावांत संपुष्टात आला.
त्याआधी, अंगक्रिशने ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. हरनूर सिंगनेही १०१ चेंडूंत १२ चौकारांसह ८८ धावा करत अंगक्रिशला चांगली साथ दिली. दोघांनी २५.४ षटकांत १६४ धावांची सलामी देत भारताला भक्कम सुरुवात करून दिली. यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने भारताला मोठी मजल मारण्यात यश आले नाही.
भारताने तब्बल आठ गोलंदाजांचा वापर केला. गर्व सांगवान, अनिश्वर गौतम आणि कौशल तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आयर्लंडकडून स्कॉट मॅकबेथने सर्वाधिक ३२ धावा केल्या.
Web Title: India vs Ireland U19 World Cup 2022 India beat Ireland by 174 runs qualify for Super League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.