India vs Nepal Live Marathi Update : भारतीय संघाने पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात नेपाळवर दणदणीत विजयाची नोंद केली. आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करावी लागल्यानंतर नेपाळविरुद्धही तिच परिस्थिती ओढावली होती. पण, अडीच तासांनी पाऊस थांबला अन् ग्राऊंड्समनच्या मेहनतीने सामना पुन्हा सुरू झाला. भारतासमोर ठेवण्यात आलेल्या २३ षटकांत १४५ धावांच्या सुधारित लक्ष्याचा रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावत १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारताने हा सामना जिंकून सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के केले.
रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video
सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी २३१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी २.१ षटकांत १७ धावा चढवल्या होत्या. पण, पावसाची जोरदार एन्ट्री झाल्याने सामना थांबवावा लागला. दोन-अडीच तासानंतर म्हणजेच १० वाजता मैदानाची पाहणी झाली अन् १०.१५ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले गेले. भारताला २३ षटकांत १४५ धावांचं सुधारित लक्ष्य दिले गेले. पावसामुळे खेळपट्टी संथ झाली होती आणि नेपाळच्या गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचे ठरवले होते. रोहितनेही त्यांना स्कूप मारून उत्तर दिले. रोहित व शुबमन गिलने १० षटकांत ६४ धावा फलकावर चढवल्या. रोहितचा झेल घेण्याची संधी नेपाळच्या खेळाडूने गमावली.
११व्या षटकानंतर रोहितने गिअर बदलला अन् चौकार-षटकार खेचण्यास सुरूवात केली. त्याने ३९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. रोहित आशिया चषकात १० वेळा ५०+ धावा करणारा पहिला भारतीय ठरला. सचिन तेंडुलकरने ९ वेळा हा पराक्रम केला होता. तसेच वन डे क्रिकेटमध्ये २५० षटकार खेचणारा तो पहिला भारतीय ठरला. रोहित व शुबमन गिल यांनी १०० धावांची भागीदारी केली. शुबमननेही ४७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून फॉर्म मिळवला. रोहितने ५९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या,तर शुबमनने ६२ चेंडूंत ८ चौकार व १ चौकारासह नाबाद ६७ धावा केल्या. या दोघांनी २०.१ षटकांत १४७ धावा करून भारताचा दणदणीत विजय पक्का केला.
तत्पूर्वी, नेपाळच्या फलंदाजांनी आज आत्मविश्वासाने खेळ केला. सलामीवीर कुशल भुर्तेल ( ३८) आणि आसिफ शेख यांनी ६५ धावांची भागीदारी केली. आसिफने ९७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी पहिल्या ५ षटकांत ३ झेल सोडले. गुलशन झा ( २३) याने चांगली फटकेबाजी केली. दिपेंद्र सिंग ऐरी ( २९) आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सोमपालने ५६ चेंडूंत ४८ धावा केल्या आणि संघाला २३० धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.