India vs Nepal Live Marathi Update : नेपाळच्या फलंदाजांचा आत्मविश्वास पाहून भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने BCCI ला नेपाळ क्रिकेटच्या प्रगतीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. भारताविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नेपाळने अपेक्षेपेक्षा बराच चांगला खेळ केला. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेही नेपाळच्या आजच्या खेळाचे तौंडभरून कौतुक केले. उलट भारतीय खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका झाल्या आणि त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा प्रचंड संतापला. शेवटच्या षटकापर्यंत भारतीय खेळाडूंचा गोंधळ सुरू होता आणि रोहित डोक्यावर हात मारणेच बाकी होता.
रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video
भारतीय खेळाडूंनी पहिल्या ५ षटकांत ३ झेल सोडले. कुशल भुर्तेल ( ३८) आणि आसिफ शेख यांनी ६५ धावांची भागीदारी केली, परंतु शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) फिरकीच्या तालावर नेपाळला नाचवले आणि ३ विकेट्स घेतल्या. भीम शार्की ( ७), नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल ( ५) आणि कुशल मल्ला ( २) यांची विकेट त्याने घेतली. आसिफने अर्धशतकी खेळी करून नेपाळचा गड सांभाळला. गुलशन झा याचे फटके पाहण्यासारखे होते. मोहम्मद सिराजला त्याने मारलेला अपर कट, त्यानंतर यष्टिरक्षक-स्लीपमधून लेट कट मारून मिळवलेला चौकार पाहून सर्वांनी कौतुक केले. मोहम्मद सिराजने नेपाळचा सलामीवीर आसिफला ९७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर झेलबाद केले.
पुढच्या षटकात त्याने गुलशनची ( २३) विकेट मिळवून दिली. नेपाळला १४४ धावांवर सहावा धक्का बसला. पावसामुळे ३७.५ षटकांत सामना थांबवण्यात आला आणि नेपाळच्या ६ बाद १७८ धावा झाल्या आहेत. जडेजाने ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि आशिया चषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक २२ विकेट्स घेणाऱ्या इरफान पठाणच्या विक्रमाशी बरोबरी केली. दिपेंद्र सिंग ऐरी आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना उघडे पाडले. हार्दिकने ही भागीदारी तोडली. दिपेंद्र २५ चेंडूंत २९ धावांवर पायचीत झाला. पण, सोमपाल चांगलाच पेटला होता आणि त्याने ५६ चेंडूंत ४८ धावा चोपल्या. नेपाळने १० बाद २३० धावा केल्या. सिराजने ३ विकेट्स घेतल्या.