India vs Nepal Live Marathi Update : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत का खेळवती जातेय, अशा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. त्यात भारतीय संघाच्या सामन्यात पावसाची हमखास हजेरी, ठरलेली आहे. पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करावी लागली. नेपाळविरुद्धच्या सामन्यातही तिच परिस्थिती ओढावली होती. भारतीय इनिंग्जच्या २.१ षटकानंतर पावसाने हजेरी लावली अन् जोर इतका होता की संपूर्ण मैदान झाकावं लागलं.
नेपाळच्या फलंदाजांनी आज भारताविरुद्धच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात आत्मविश्वासाने खेळ केला. सलामीवीर कुशल भुर्तेल ( ३८) आणि आसिफ शेख यांनी ६५ धावांची भागीदारी केली. आसिफने ९७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी पहिल्या ५ षटकांत ३ झेल सोडले. गुलशन झा ( २३) याने चांगली फटकेबाजी केली. दिपेंद्र सिंग ऐरी ( २९) आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सोमपालने ५६ चेंडूंत ४८ धावा केल्या आणि संघाला २३० धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. भारतीयांचे क्षेत्ररक्षण आज अत्यंत गचाळ झाले आणि त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा प्रचंड नाराज दिसला. रवींद्र जडेजाने मधल्या षटकांत ३ धक्के दिल्याने भारताला आधार मिळाला. मोहम्मद शमीनेही ३ विकेट्स घेतल्या.
सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आहे. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी सावध सुरूवात करताना २.१ षटकांत १७ धावा चढवल्या आहेत. पण, पावसाची जोरदार एन्ट्री झाल्याने सामना थांबवावा लागला आहे. १० वाजता मैदानाची पुन्हा पाहणी झाली अन् १०.१५ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले गेले. भारताला २३ षटकांत १४५ धावांचं सुधारित लक्ष्य दिले गेलेय. त्यापैकी २.१ षटकांत बारताने १७ धावा केल्या आहेत आणि आता त्यांना १२७ धावा करायच्या आहेत.