नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डे सामन्यात झोकात सुरुवात केली. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेले यजमान न्यूझीलंडचे सलामीवीर 18 धावांवर माघारी परतले. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने भारताला हे यश मिळवून दिले आणि सर्वात जलद 100 विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांचा मान पटकावला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौरा गाजवण्यास सज्ज झाल्या आहेत. त्याची प्रचिती पहिल्याच सामन्यात आली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेला तरी भारतीय गोलंदाजांनी परिस्थिती आपल्या बाजूने झुकवली. शमीने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात मार्टिनगुप्तीलचा त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात त्याने कॉलीन मुन्रोला बाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिले.गुप्तीलची विकेट ही शमीसाठी विक्रमी ठरली. त्याने यासह विकेट्सचे शतक साजरे केले. भारतीय गोलंदाजांत सर्वात शंभर विकेट्स घेण्याचा विक्रम शमीने स्वतःच्या नावावर केला. त्याने 56 सामन्यांत ही कामगिरी करताना इरफान पठाणचा ( 59 सामने) विक्रम मोडला. या क्रमवारीत झहीर खान ( 65 ), अजित आगरकर ( 67 ) आणि जावगल श्रीनाथ ( 68 ) हे अव्वल पाचमध्ये येतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये अफगाणिस्तानच्या रशिद खानच्या नावावर सर्वात जलद शंभर विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 44 सामन्यांत हा पराक्रम केला. शमीने या यादित सहावे स्थान पटकावत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टशी बरोबरी केली.