भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी एकाच सामन्यात पदार्पण करताना संघाला अर्धशतकी सलामीही करून दिली. पण, या दोघांनाही मोठी खेळी साकारण्यात अयपश आलं. कोहलीनं श्रेयस अय्यरसोबत आणि श्रेयसनं लोकेश राहुलसोबत अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली. त्या जोरावर भारतानं यजमानांसमोर तगडं आव्हान उभं केलं. पण, या सामन्यात विराटला चक्रावून टाकणाऱ्या चेंडूचीच चर्चा राहिली.
वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. विराट अन् श्रेयसची 102 धावांची भागीदारी इश सोढीनं सुंपष्टात आणली. 29व्या षटकातील चौथा चेंडू मॅजिकल ठरला. सोढीनं टाकलेल्या त्या चेंडूनं विराटच्या बॅट-पॅडमधून वाट काढत यष्टिंचा वेध घेतला. विराटही काही काळ हतबल झालेला पाहायला मिळाला. तो 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा करून तंबूत परतला.
श्रेयसनं काही उत्तुंग षटकारही खेचले. त्यानं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह शतकी भागीदारी केली आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. श्रेयस 107 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावांवर मिचेल सँटनरच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर लोकेश व केदार जाधवनं फटकेबाजी केली. भारतानं 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा डोंगर उभा केला. लोकेश 64 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 88 धावांवर नाबाद राहिला. इश सोढीनं विराटचा उडवलेला त्रिफळा हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
पाहा व्हिडीओ...
भारताच्या त्रिकुटानं धू धू धुतलं, टीम इंडियानं 'डोंगरा' एवढं आव्हान उभं केलं!
11 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये घडवला इतिहास, हा विक्रम आहे खास
पृथ्वी शॉ-मयांक अग्रवाल जोडीनं 1976नंतर न्यूझीलंडमध्ये घडवला पराक्रम