नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी एक पराक्रम केला. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिडच्या दिग्गज फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली 10व्या स्थानावर पोहोचला आहे. अव्वल दहा जणांमध्ये स्थान पटाकवणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला.
भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला. पहिल्या वन डे सामन्यात भारताला विजयासाठी अवघ्या 158 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली.
रोहित शर्मा व शिखर धवन यांनी 41 धावांची सलामी दिली. उपहारानंतर रोहित माघारी परतला आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी धवनसह अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. कोहलीने या सामन्यात लाराच्या विक्रमाला मागे टाकले. कोहलीने विंडीजच्या लाराचा 10405 धावांचा विक्रम मोडताना अव्वल दहामध्ये स्थान पटकावले.