वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : वन डे मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ यजमान न्यूझीलंडला ट्वेंटी-20 मालिकेतही पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. वन डे मालिकेत अंबाती रायुडू, मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या यांनी दमदार कामगिरी केली. मात्र, ट्वेंटी-20 मालिकेत भारताचे काही प्रमुख खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही नवे चेहरे संघासोबत सरावाला लागले आहेत.
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी व दिनेश कार्तिक हेही संभाव्य संघात असल्याने यष्टिमागे कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती हा धोनीच असणार आहे. त्याचबरोबर तो मधल्या फळीत रिषभला फलंदाज म्हणून संधी देऊ शकतो. रिषभने नुकत्याच खेळलेल्या भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंड लायन्स संघाचविरुद्ध 73 धावांची नाबाद खेळी केली होती.
कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असल्यामुळे उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेत रोहितला 'कॅप्टन' कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 31 वर्षीय रोहितने 12 ट्वेंटी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यात 11 विजय मिळवण्यात भारताला यश आले. दुसरीकडे कोहलीने 20 ट्वेंटी-20 सामन्यांत नेतृत्व करताना भारताला 12 विजय मिळवून दिले आहेत. रोहितला आगामी ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून कर्णधार म्हणून कोहलीचा सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 41 विजयांसह ( 72 सामने) आघाडीवर आहे.
असा असेल संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद.