वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाची न्यूझीलंडमधील ट्वेंटी-20 क्रिकेटमधील विजयाची पाटी नऊ वर्षानंतरही कोरीच राहिली. भारतीय संघाला यजमान न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 80 धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडच्या 219 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 139 धावांत तंबूत परतला. भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम महेंद्रसिंग धोनी (39) याच्या नावावर राहिला. कॅप्टन कूल धोनीनं या सामन्यात विक्रमाचा एक पल्ला सर केला.
कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सेइफर्टने 43 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. त्याला मुन्रो ( 34), कर्णधार केन विलियम्सन ( 34), रॉस टेलर ( 23) आणि स्कॉट कुगलेंजने ( 20*) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन व विजय शंकर वगळता भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा (1), रिषभ पंत (4), दिनेश कार्तिक ( 5), हार्दिक पांड्या ( 4) यांनी निराश केले. इश सोधी व मिचेल सँटनर यांनी भारताच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर होता खरा, परंतु धावा आणि चेंडू यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्यात तो अपयशी ठरला. 39 धावांवर धोनी बाद झाला.
या सामन्यात धोनीने 13 वी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1500 धावांचा पल्ला गाठला. ट्वेंटी-20 त 1500 धावा करणारा धोनी हा चौथा भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे धोनीने अंतिम टप्प्यातील 500 धावा या आधीपेक्षा जलद केले. ट्वेंटी-20 त त्याने पहिल्या 500 धावा 28 डावांत, तर दुसऱ्या 30 डावांत पार केल्या. 1000 ते 1500 हा पल्ला गाठण्यासाठी त्याला केवळ 23 डाव खेळावे लागले.