India vs New Zealand 1st T20I series: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिली टी२० लढत पावसामुळे रद्द झाली. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता हा सामना सुरू होणे अपेक्षित होते, परंतु मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने दुपारी २.१७चा कट ऑफ टाईम ठेवण्यात आला होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे १ वाजून १७ मिनिटांनीच ही लढत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, वेलिंग्टनमधील पहिल्या टी२० सामन्यादरम्यान समालोचक आणि माजी क्रिकेटर सायमन डूल नाराज दिसला.
सायमन डूलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. त्यामध्ये तो कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेली अस्वच्छता दाखवत होता. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, येथे खेळण्याचे आणखी एक मोठे कारण आहे. आमच्या परदेशी पाहुण्यांना नीट बसता यावे म्हणून मी कॉमेंट्री बॉक्समधील सर्व जागा आता स्वतः स्वच्छ केली आहे. अशी अस्वच्छता खूपच वाईट आहे हा प्रकार लज्जास्पद आहे. न्यूझीलंडमध्ये आपले स्वागत आहे, असे खोचक ट्विट त्याने केले.
अनेकदा माजी क्रिकेटपटू किंवा प्रेक्षक खराब व्यवस्थेवर नाराज असल्याचे पाहायला मिळते. परंतु न्यूझीलंडसारख्या अतिशय व्यवस्थित आणि नीटनेटकेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळ)
- पहिला T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 (वेलिंग्टन)
- दुसरा T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई)
- तिसरा T20: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर)
- पहिला वनडे: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ऑकलंड)
- दुसरी वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (हॅमिल्टन)
- तिसरी वनडे: 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7.00 (ख्राईस्टचर्च)