Join us  

India vs New Zealand 1st T20 : भारतीय संघाने लाज घालवली, 9 वर्षांतील लाजिरवाणा पराभव

India vs New Zealand 1st T20 : न्यूझीलंडने हा सामना 80 धावांनी जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:27 PM

Open in App

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचे दडपण फलंदाजांवर प्रकर्षाने जाणवले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. न्यूझीलंडने पाहुण्या भारताला 139 धावांवर रोखले आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने हा सामना 80 धावांनी जिंकला. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. 9 वर्षांत भारताचा असा लाजिरवाणा पराभव झाला नव्हता.कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सेइफर्टने 43 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. त्याला मुन्रो ( 34), कर्णधार केन विलियम्सन ( 34), रॉस टेलर ( 23) आणि स्कॉट कुगलेंजने ( 20*) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला. धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. याआधी 2010 साली ऑस्ट्रेलियाने ब्रिजटाऊन येथे भारतावर 49 धावांनी विजय मिळवला होता, तर 2016 मध्ये न्यूझीलंडने नागपूर येथे भारताला 46 धावांनी नमवले होते. भारताला सर्वाधिक ट्वेंटी-20 सामन्यांत पराभवाची चव चाखवण्याच्या विक्रमाशी न्यूझीलंडने बरोबरी केली. न्यूझीलंड व इंग्लंड यांनी सात ट्वेंटी-20 सामन्यांत भारतावर विजय मिळवले आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माबीसीसीआय