India vs New Zealand, 1st Test Day 1 Play Has Been Called Off For The Day : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु कसोटीतील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. सामन्याच्या आधी बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस झाला. बुधवारी जोर कमी झाला असला तरी पावसाची उघड-झाप कायम असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी पहिल्या दिवशी नाणेफेकीसाठी देखील दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात उतरु शकले नाहीत.
पहिल्या दिवसातील कसर भरून काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी लवकर होणार टॉस
पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यानंतर ही कसर भरून काढण्यासाठी आता दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी टॉस घेण्यात येणार आहे. जेणेकरून सकाळी ९ : १५ पहिल्या सत्रातील खेळाला सुरुवात करून दिवसभरात ९८ षटकांचा खेळ होईल. कसोटीतील गेल्या काही काळातील कल पाहिला तर कसोटी सामन्याचा निकाल लागण्यासाठी ४ दिवसही पुरेसे ठरतात, हे दिसून आले आहे. त्यामुळेच भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा निकाल उर्वरीत चार दिवसांतही लागू शकेल. पण यासाठी किमान उर्वरित दिवसांचा खेळ होणं गरजेचे आहे. पावसाचा तोरा असाच राहिला तर मात्र गोष्टी अवघड होऊ शकतात.
कसा असेल दुसरा दिवस?
- पहिले सत्र- सकाळी ९:१५ ते सकाळी ११:३० पर्यंत
- दुसरे सत्र- दुपारी १२:१० ते दुपारी २:२५ पर्यंत
- तिसरे सत्र- दुपारी २ :४५ ते ४ :४५ पर्यंत
खेळपट्टी तयार करण्यासाठी ग्राउंडसमनला घ्यावी लागणार मेहनत
बंगळुरुच्या स्टेडियमवरील ड्रेनेज यंत्रणा अर्थात मैदानातील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था सर्वोत्तम आहे. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययानंतर मैदान पुन्हा खेळण्यायोग्य करण्याची मोठी समस्या इथं निर्माण होणार नाही. पण सामन्याआधी इथं जोरदार पाऊस झाल्यामुळे खेळपट्टीवर कव्हर टाकण्यात आले होते. कव्हर हटवल्यानंतर पुन्हा ग्राउंड्समन स्टाफला खेळपट्टीचे काम करावे लागेल. त्यांना यासाठी किमान तास ते दोन तासांचा वेळ लागणार होता. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना आवश्यक असणाऱ्या वेळापेक्षा अधिक वेळ त्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.