Join us  

टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला; Matt Henry चा 'पंजा' अन् William ORourke चा 'चौका'

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 1:40 PM

Open in App

IND vs NZ: India bowled out for lowest Test total at home by New Zealand : बंगळुरु कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसाने वाया गेला. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. पण हा निर्णय चांगलाच फसला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाची कसोटी सामन्यातील ही आतापर्यंतची निच्चांकी धावसंख्या ठरली. 

दोघांनी कसा बसा गाठला दुहेरी धावसंख्येचा आकडा

रिषभ पंतनं ४९ चेंडूत केलेल्या २० धावा ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने ६३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. पंतच्या भात्यातून २ आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला. भारताच्या पहिल्या डावात फक्त ४ चौकार पाहायला मिळाले. 

मॅट हेन्रीचा पंजा तर ओ'रुर्कचा 'चौका'

न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने पंजा मारला. १३. २ षटकात त्याने ३ निर्धाव षटकांसह १५ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ'रुर्क याने आपल्या खात्यात ४ विकेट्स जमा केल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.  

पहिल्या तासात भारतीय संघाने गमावल्या आघाडीच्या तीन विकेट्स

पहिल्या दिवस पावसामुळे वाया गेला. परिणामी पहिल्या कसोटी सामन्यातील नाणेफेक ही दुसऱ्या दिवशी झाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक  जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चांगलाच फसला. यशस्वी जैस्वालसोबत रोहित शर्मानं भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ९ धावा असताना रोहितच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही. विराट अन् सर्फराजही ठराविक अंतराने माघारी फिरले अन् टीम इंडिया अडचणीत आली.

विराटसह ५ फलंदाजांना उघडता आले नाही खाते

 बऱ्याच वर्षांनी म्हणजे २०१६ नंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या सर्फराज खानच्या पदरीही भोपळाच आला.  विराट कोहली आणि सर्फराज खानशिवाय लोकेश राहुल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना आपलं खातही उघडता आले नाही. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड