India vs New Zealand 1st Test Day 2: Stumps New Zealand lead by 134 runs : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिला दिवस पावसाने गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघानं हवा केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डावात अवघ्या ४६ धावांत गारद केले. त्यानंतर किवी संघाने फलंदाजीतही आपली छाप सोडली.
दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंड ३ बाद १८० धावा
सलामीवीर डेवॉन कॉन्वेच्या (Devon Conway) ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या संघाने धावफलकावर ३ बाद १८० धावा लावल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रचिन रविंद्र (Rachin Ravindra) ३४ चेंडूत २ चौकाराच्या् मदतीने २२ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) ३९ चेंडूचा सामना करून एका चौकाराच्या मदतीने १४ धावांवर नाबाद होता.
न्यूझीलंडनं पहिल्या डावात ३ विकेट्स गमावल्या, पण...
भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ आटोपल्यावर किवी संघाचा कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham ) आणि डेवॉन कॉन्वे या जोडीनं न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. ४९ चेंडूत १५ धावा करून किवी कर्णधार माघारी फिरला. कुलदीप यादवनं त्याची विकेट घेतली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या विल यंग यानेही कॉन्वेला उत्तम साथ दिली. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीनं ७५ धावांची भागीदारी रचली. ही जोडी सेट झाली असताना रवींद्र जडेजाने टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. विल यंग ७३ चेंडूत ३३ धावांची खेळी करून तंबूत परतला. शतकाच्या उंबरठ्यावर अश्विननं डेवॉन कॉन्वेला तंबूत धाडत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. न्यूझीलंडच्या संघाने ३ विकेट्स गमावल्या असल्या तरी त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाचा पहिला डाव गडबडला , सर्वांनीच किवी गोलंदाजीसमोर टाकली नांगी
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना खूपच निराश केले. मायदेशातील कसोटी सामन्यात सर्वात निच्चांकी धावसंख्या नोंदवण्याचा लाजिरवाणा विक्रम टीम इंडियाचे नावे झाला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने एका चौकाराच्या मदतीने ६३ चेंडूत केलेल्या १३ धावा आणि रिषभ पंतनं ४९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने केलेली २० धावांची खेळी वगळता अन्य एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेसा खेळ करायला जमलं नाही. रोहित शर्मा, २(१६), विराट कोहली ०(९), सर्फराज खान ०(३), लोकेश राहुल ०(६), रविंद्र जडेजा ०(६), आर अश्विन ० (१). जसप्रीत बुमराह १(३) यांच्यासमोरील धावसंख्येचा आकडा थक्क करून सोडणारा होता. मोहम्मद सिराज एक चौकार मारून ४ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: India vs New Zealand 1st Test Day 2: Stumps New Zealand lead by 134 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.