बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाला 'विराट' धक्का देत थांबला. न्यूझीलंडच्या संघाचा पहिला डाव सर्व बाद ४०२ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २३१ धावा लावल्या होत्या.
तिसऱ्या दिवसाच्या खेळातील शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट
तिसऱ्या दिवसातील खेळाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. आता चौथ्या दिवशी सर्फराज खानवर भारतीय संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी असेल. भारतीय संघ अजूनही १२५ धावांनी पिछाडीवर आहे. या धावा करून भारतीय संघाला पाहुण्या संघासमोर टार्गेट सेट करायचे आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामन्यावरील पकड मजबूत करण्यासाठी ७ विकेट्स घ्याव्या लागतील.
सर्फराजन खान नाबाद
पहिल्या डावात ४६ डावात आटोपलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात अगदी दिमाखात फलंदाजी केली. पण सेट झाल्यावर भारतीय संघाने अनेपक्षितरित्या विकेट्स गमावल्याचा सीन पाहायला मिळाला. यात यशस्वी जैस्वालनं ३५ (५२) गरज नसताना आक्रमक फटका मारण्याची केलेली घोडचूक आणि रोहित शर्मानं ५२ (६३) नं सेट झाल्यावर गमावलेल्या विकेट्सचा समावेश आहे. त्यात तिसऱ्या दिवसाअखेर विराट कोहलीची भर पडली. कोहली १०२ चेंडू ७० धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूला सर्फराज खान भर पडली ती विराट कोहलीच्या विकेटचीही भर पडली. सर्फराज खान ७८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७० धावांवर नाबाद खेळत होता. न्यूझीलंडकडून एजाज पटेल याने यशस्वी आणि रोहितची विकेट घेतली. दुसरीकडे ग्लेन फिलिप्सनं विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला.
आता या गड्यांवर असेल टीम इंडियाची मदार
सर्फराज खान याच्या भात्यातून बंगळुरुच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील एक मोठी खेळी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली आहे. ७० धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा आकडाही गाठलाय. धावसंख्येचा आकडा तिहेरी घरात तो टीम इंडियाचं टेन्शन दूर करणार का? ते पाहण्याजोगे असेल. त्याच्याशिवाय चौथ्या दिवसाच्या खेळात लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या चौंघावरही टीम इंडियाची मदार असेल.