India vs New Zealand 1st Test Day 4 Sarfaraz Khan Hits Maiden Test Century : पहिल्या डावातील ढिसाळ कामगिरीमुळे अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात दिमाखात कमबॅक केले आहे. भारतीय संघाला पुन्हा पटरीवर आणण्यात मुंबईकर सर्फराज खान याने मोलाचा वाटा उचलला. साउदीच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार मारत सर्फराजनं बंगळुरुच्या मैदानात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं.
शतकी खेळीनंतर सर्फराजचा आनंद गगनात मावेना!
सर्फराज खान याने शतक पूर्ण करण्यासाठी ११० चेंडूंचा सामना केला. या शतकी खेळीत त्याने १३ चौकार आणि ३ षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ अडचणीत असताना त्याच्या भात्यातून आलेले शतक त्याच्यासाठी अविस्मरणीय असेच आहे. त्यामुळेच त्याने शतकी खेळीनंतर खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले.
संधी मिळली की त्याचं सोनं कसं करायचं ते या मुंबईकराकडून शिकण्याजोगे
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढणाऱ्या मुंबईकराला ज्या ज्या वेळी टीम इंडियात संधी मिळाली त्या त्या वेळी त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली. पण अखेर चौथ्या सामन्यात केलेल्या चौथ्या अर्धशतकाचं शतकात रुपांतर करण्यात त्याला यश आले. सर्फराज खान हा शतकी खेळी करून थांबणाऱ्या फलंदाजातील नाही. एकदा तो लयीत आला तर २०० अन् ३०० धावांचा आकडा गाठण्यात तो कमी पडत नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने ते दाखवून दिले आहे. आता टीम इंडियासाठी तो अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी आधी इराणी करंडक स्पर्धेत त्याने द्विशतकी खेळी केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
सर्फराज खानची खास क्लबमध्ये एन्ट्री
पहिल्या शतकी खेळीसह सर्फराज खान याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. टीम इंडियाकडून कसोटी सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकवणारा भारताचा तो सातवा फलंदाज आहे. याआधी या क्रमांकावर सचिन तेंडुलकर, विराट कोहली,. राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणे यांनी अशी कामगिरी केली आहे.
शुबमन गिलच्या दुखापतीमुळे सर्फराज खान याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते. पण दुसऱ्या डावात ही कसर भरून काढत त्याने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढणारी खेळी केली आहे.