India vs New Zealand, 1st Test Day 5: Start delayed due to wet outfield भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला विलंब होताना दिसतोय. पाऊस थांबला असला तरी मैदानातील ओलसरपणामुळे पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेत सुरु होऊ शकलेला नाही. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पंचांकडून मैदानाच निरीक्षण करण्यात आलं. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, १० वाजून १५ मिनिटांनी पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु होईल. तासाभरात भारतीय संघाने न्यूझीलंडला धक्क्यावर धक्के दिले तर टीम इंडियासाठी एक संधी निर्माण होऊ शकते.
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी न्यूझीलंडच्या संघासमोर १०७ धावांचे अल्प आव्हान आहे. दुसरीकडे भारतीय संघाला विजयासाठी कमी वेळेत १० विकेट्स मिळवण्याचे मोठे चॅलेंज आहे. तासाभराच्या खेळात सामन्याचा कल नेमका कुणाच्या बाजूनं झुकणार त्याचा अंदाज बांधता येईल. भारतीय संघ या वेळेत सर्वोत्तम दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज आणि अन्य गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल.
असा असेल पाचवा अन् अखेरचा दिवस
- पहिले सत्र - सकाळी १०:१५ ते दुपारी १२:३०
- दुसरे सत्र- दुपारी १:१० ते दुपारी ३: १०
- तिसरे सत्र- दुपारी ३: ३० ते सायंकाळी ५: १५
खेळ सुरु झाल्यानंतरही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीमुळेही सामन्यावर परिणाम होऊ शकतो. आता त्याचा फायदा कुणाला मिळणार ते बघण्याजोगे असेल.