भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय चांगलाच फसला. न्यूझीलंडच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाजांसमोर भारतीय सलामी जोडी चाचपडत खेळताना दिसली. त्यात कॅप्टन रोहित शर्मा टिम साउदीच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा १६ चेंडूचा सामना करून अवघ्या २ धावांवर तंबूत परतला. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील फ्लॉप शोनंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची त्याची सुरुवातही खराब झाली आहे.
टीम साउदीनं परफेक्ट सेटअपसह रोहितला दिला चकवा, गंभीरही झाला आवाक्
टिम साउदीनं अगदी परफेक्ट सेटअपसह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवलं. रोहित शर्मासमोर गोलंदाजी करताना साउदीनं आधी काही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर काढले अन् एक चेंडू चौथ्या स्टंपवरून आत घेत त्याला क्लीन बोल्ड केले. रोहित शर्मा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या जबरदस्त इन-स्विंग चेंडूवर बोल्ड झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये गौतम गंभीरही आवाक् झाल्याचा सीन पाहायला मिळाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अन् रोहित शर्मा फसला!
भारताच्या पहिल्या डावातील सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने क्रिज सोडून फटका मारण्याचा प्रयत्न केला. जवळपास चौथ्या स्टंपच्या आसपास पडलेला चेंडू मारण्यात तो फसला. कारण साउदीनं तो अप्रतिमरित्या आत वळवला होता. हा चेंडू लेग स्टंपच्या अगदी वरच्या बाजूला जाऊन आदळला आणि रोहितचा खेळ खल्लास झाला.
साउदीनं सर्वाधिक वेळा केलीये रोहितची शिकार
टीम साउदीनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक १३ वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. याशिवाय विराट कोहली आणि श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेला त्याने ११ वेळा बाद केले आहे.