बंगळुरुच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीनं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. या डावातील अर्धशतकी खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये एक मैलाचा पल्ला त्याने गाठला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पा त्याने पार केला. असा पराक्रम करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला.
'कासव'गतीनं इथंवर पोहचला कोहली
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये नऊ हजारी पल्ला गाठण्यासाठी १९७ डाव खेळले. किंग कोहलीनं आतापर्यंत कसोटीत ४० पेक्षा अधिकच्या सरासरीने ९००० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. यात २५४ धावा ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात एकदम लयीत खेळत असणारा विराट कोहली तिसऱ्या दिवसाच्या खेळातील अखेरच्या चेंडूवर विकेटमागे झेलबाद झाला. दुसऱ्या डावात त्याने १०२ चेंडूत ७० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
विराट आधी या मंडळींनी पार केला आहे हा मैलाचा टप्पा
विराट कोहली आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी कसोटी कारकिर्दीत ९००० हून अधिक धाव केल्या आहेत. कोहलीनं हा टप्पा गाठण्यासाठी १९७ डावा खेळले. त्यामुळे तो संथगतीने हा पल्ला गाठणारा भारतीय ठरला आहे. सर्वाधिक जलगत गतीने हा पल्ला गाठण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावे आहे.
भारताच्या कोणत्या खेळाडूनं किती डावात गाठला ९००० धावांचा पल्ला ?
राहुल द्रविड १७६ डाव
सचिन तेंडुलकर १७९ डाव
सुनील गावसकर १९२ डाव
विराट कोहली १९७ डाव*
विराट कोहलीची कसोटीतील कामगिरी
विराट कोहलीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११६ सामन्यातील १९७ डावात २९ शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या खात्यात ७ द्विशतकाचीही नोंद आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आणखी एका शतकाची नोंद करेल, असे वाटत होते. पण तिसऱ्या दिवसातील अखेरच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली.
Web Title: India vs New Zealand, 1st Test Virat Kohli becomes slowest Indian to reach 9000 runs in Tests
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.