वेलिंग्टन - टी-20 मालिकेत भारताने आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत म्हणावी तशी तळपलेली नाही. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यास तो उत्सूक असेल. या मालिकेमध्ये तीन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी विराटकडे असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वर्चस्व राखून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कामय राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर एकदिवसीय मालिकेनंतर कसोटीतही भारताला धक्का देण्यास यजमान न्यूझीलंडचा संघ उत्सुक असेल. दरम्यान, विराट कोहलीसाठीही ही मालिका खास ठरणार आहे. या मालिकेत तीन मोठ्या विक्रमांन गवसणी घालण्याची संधी विराटकडे आहे. ते विक्रम पुढीलप्रमाणे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके विराट कोहलीच्या नावावर कर्णधार म्हणून आतापर्यंत 41 शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिटेमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्यासह संयुक्तरीत्या अव्वलस्थानावर आहे. मात्र आता वेलिंग्टन कसोटीत शतक फटकावल्यास आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी येईल. दरम्यान, रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी सलामीवीरांच्या अनुपस्थितीत विराट कोहलीवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे.
SENA देशांमध्ये शतक फटकावणाऱा पहिला आशियाई कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपद स्वीकारल्यापासून दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सामन्यांत शतके फटकावली आहेत. आता न्यूझीलंडमध्ये शतकी खेळी केल्यास विराट कोहली हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या फलंदाजी करण्यास कठीण समजल्या जाणाऱ्या SENA देशांमध्ये शतके फटकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरणार आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक सामनावीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके फटकावण्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीराचा मान पटकावण्याचा विक्रमही रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये कर्णधारपद सांभाळताना एकून 28 वेळा सामनावीराचा मान पटकावला होता. तर विराटने कर्णधारपद सांभाळल्यापासून आतापर्यंत 27 वेळा सामनावीराचा मान पटकावला आहे. त्यामुळे या मालिकेत पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची किंवा हा विक्रम मोडण्याची संधी विराटकडे आहे.