माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. रोहित शर्माला ( 87) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मात्र, फिरकीपटू कुलदीप यादवनेही या विजयात मोठा वाटा उचलला. त्याने न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना 45 धावा देत माघारी पाठवले. कुलदीपने या कामगिरीसह भारताचा माजी कर्णधार व दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाशी केली बरोबरी.
भारतीय फिरकीपटूंनी या वन डे मालिकेत आतापर्यंत 13 विकेट घेतल्या आहेत. 1994 आणि 2009 मध्ये भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंड दौऱ्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या. तोही विक्रम या मालिकेत मोडला गेला. वन डे सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेण्याचा विक्रम कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 269 सामन्यांत 10 वेळा चार विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा 8 ( 147 सामने), सचिन तेंडुलकर 6 ( 463), हरभजन सिंग 5 ( 234) आणि कुलदीप यादव 5 (37) यांचा क्रमांक येतो.
न्यूझीलंडमध्ये दोन वेळा चार विकेट घेणारा कुलदीप हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने कुंबळे व जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली. आशियाई खंडाबाहेर चार विकेट घेण्याचा मान कुलदीपने पाचव्यांदा पटकावला. या कामगिरीसह त्याने कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली.