माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात नाबाद 48 धावांची खेळी केली. त्याला वन डे क्रिकेटमध्ये सलग चौथे अर्धशतक झळकावण्यात अपयश आले, परंतु त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला. न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं लाराचा हाच विक्रम मोडला होता आणि आज धोनीनं त्याच्या पावलावर पाऊल टाकलं.
भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 325 धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्मा ( 87), शिखर धवन ( 66), विराट कोहली ( 43), अंबाती रायुडू ( 47), महेंद्रसिंग धोनी ( 48*) आणि केदार जाधव ( 22*) यांनी किवी गोलंदाजांची धुलाई केली. धोनीनं चौथ्या विकेटसाठी रायुडूसह 35 धावांची, तर पाचव्या विकेटसाठी जाधवसह नाबाद 53 धावांची भागीदारी केली.
रोहित व शिखर यांच्या दीडशतकी भागीदारीनंतर मधल्या फळीतील खेळाडूंनी त्यांची भूमिका चोख बजावली. कर्णधार कोहली बाद झाला त्यावेळी भारताच्या 39.1 षटकांत 3 बाद 236 धावा होत्या. त्यानंतर धोनीनं सुरुवातीला रायुडू आणि नंतर जाधवसह भारताच्या धावासंख्येचा वेग कायम राखला. त्याने 33 चेंडूंत नाबाद 48 धावा केल्या आणि त्यात 5 चौकार व 1 षटकार यांचा समावेश होता. धोनीनं आजच्या नाबाद 48 धावांच्या खेळीसह वन डे कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 11वं स्थान पटकावलं. त्याने लाराचा 10405 धावांचा विक्रम मोडला. धोनीनं 337 सामन्यांत 10414 धावा केल्या आहेत.