माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी झटपट खेळी करताना किवींच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. रोहित व धवनने पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रमही मोडले. न्यूझीलंडमधील ही भारतीय सलामीवीरांनी केलेली दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्याशिवाय या दोघांनी शतकी भागीदारी करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचाही विक्रम मोडला.
न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमाशी रोहितने बरोबरी केली. त्याने न्यूझीलंडमध्ये वन डे सामन्यात 16 षटकार खेचली आहेत आणि हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागनेही येथे 16 षटकार खेचले आहेत. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 13 , सुरेश रैना 13 आणि सचिन तेंडुलकर 12 षटकारांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.