IND vs NZ 2nd ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी गोलंदाजी संयोजनाविषयी सांगितले. शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक हे दोघेही संघासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हांबरे यांनी सांगितले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला वन डे सामना १२ धावांनी जिंकला होता. अशा स्थितीत दुसरी वन डे जिंकून मालिका जिंकण्याचे रोहित शर्माच्या संघाचे ब्रिगेडचे लक्ष्य असेल. हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल.
शार्दुलला पहिल्या वनडेत खेळण्याची संधी मिळाली!
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने उमरान मलिकऐवजी शार्दुल ठाकूरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला होता, ज्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, शार्दुल ठाकूरने सामन्याच्या शेवटच्या षटकात मायकल ब्रेसवेलला बाद करून टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात यश मिळवले. आता टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी शार्दुल ठाकूरला खेळवण्यावर मौन सोडले आहे.
खेळपट्टी पाहून निर्णय घेऊ : म्हांबरे
पारस म्हांबरे म्हणाले, "शार्दुल ठाकूरला पहिल्या एकदिवसीय सामन्यात उमरान मलिकला डावलून निवडण्यात आले, कारण तो संघाच्या फलंदाजीतही उपयुक्त आहे. आम्ही शार्दुल ठाकूरला त्याच्या फलंदाजीमुळे निवडले. तो फलंदाजीला सखोलता देतो, उमरानची ज्या प्रकारे प्रगती होत आहे ते पाहून आनंद होतो. वेगालाही खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे गोलंदाजी आक्रमणाला एक वेगळीच दिशा मिळते. त्यामुळे या सामन्यात उमरानला खेळवण्याचा निर्णय खेळपट्टी आणि संघ संयोजनाची गरज यावर अवलंबून असेल."
"जोपर्यंत विश्वचषकाचा संबंध आहे, उमरानचा पूर्णपणे रणनीतीमध्ये सहभाग आहे आणि तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. संघाला जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. बुमराह हा पूर्णपणे वेगळा गोलंदाज आहे आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, हे सत्य मान्य करावे लागेल. त्याच्यासारख्या गोलंदाजाची जागा घेणे अवघड आहे. पण सध्या या स्तरावर इतर गोलंदाजांची चाचणी घेण्याची ही योग्य संधी आहे. हे गोलंदाज कशी कामगिरी करतात आणि दडपण कसे हाताळतात ते आपल्याला आताच पाहचा येईल," असेही म्हांबरे म्हणाले.