ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात सपशेल अपयशी ठरल्याने भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. बुधवारी वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने 80 धावांनी विजय मिळवला. या पराभवातून धडा घेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी मालिकेत बरोबरीच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. पण, कर्णधार रोहित या सामन्यात तीन बदल करणार आहे. त्यामुळे शुबमन गिल, सिद्धार्थ कौल आणि कुलदीप यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्या सामन्यात रोहित 8 फलंदाज व 6 गोलंदाजांसह मैदानात उतरला. यात हार्दिक पांड्या व विजय शंकर या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश होता. तरीही एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडने उभ्या केलेल्या 219 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 139 धावांत तंबूत परतला.
वन डे सामन्यात अपयशी ठरलेला शुबमन गिलला दुसऱ्या ट्वेंटी-20 त संधी मिळू शकते. कुलदीपला संधी मिळाल्यास युजवेंद्र चहलला विश्रांती मिळू शकते. मोहम्मद सिराज किंवा सिद्धार्थ कौल यांच्यापैकी एक संघात पुनरागमन करू शकतो. खलील अहमद व भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाऊ शकते. शुबमनचा अंतिम संघात समावेश झाल्यास तो कोणत्या क्रमवारीवर फलंदाजीला येईल, हा प्रश्न रोहितला सतावू शकतो. महेंद्रसिंग धोनी संघात स्थान पक्के करून आहे, रिषभ पंतला आणखी एक संधी मिळेल, तर दिनेश कार्तिकला विश्रांती मिळू शकते.
भारताचा संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.