भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं गोलंदाजांचा सुरेख वापर केला. भारतीय गोलंदाजांनीही कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. रवींद्र जडेजानं 18 धावांत दोन विकेट्स घेतल्या. पण, या सामन्यात असा एक प्रसंग आला की कर्णधार विराट कोहलीला तोंड लपवावे लागले.
न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी टीम इंडियाच्या शार्दूल ठाकूरला लक्ष्य करताना चौकार-षटकार खेचले, पण त्याच शार्दूलला यश मिळालं. सहाव्या षटकात शार्दूलनं किवीच्या गुप्तीलला बाद केले. विराट कोहलीनं मिडऑफला झेल टीपला. गुप्तील 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 33 धावांवर माघारी परतला.
गुप्तीलचा झेल टीपून विराट कोहलीनं हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला. सामन्याच्या नवव्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. शिवम दुबेनं मुन्रोला बाद केले. 26 धावा करणाऱ्या मुन्रोचा कर्णधार कोहलीनं सुपर झेल टीपला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टीपणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीनं 41 झेल टीपले असून. त्यानं रोहित शर्माचा 39 झेलचा विक्रम मोडला. या विक्रमात सुरेश रैना 42 झेलसह अव्वल स्थानावर आहे.
11व्या षटकात रवींद्र जडेजानं किवींना धक्का दिला. कॉलीन डी ग्रँडहोमला त्यानं स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. पुढील षटकात जडेजानं आणखी एक विकेट घेतली. त्यानं किवी कर्णधार केन विलियम्सनला ( 14) बाद केले. त्यानंतर रॉस टेलर आणि टीम सेइफर्ट यांनी किवींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्यांना फार फटकेबाजी करता आली नाही. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराटनं किवी फलंदाज रॉस टेलरचा सोपा झेल सोडला. तेव्हा विराटला तोंड लपवावे लागले. बुमराहलाही यावर विश्वास बसला नाही.