Ravichandran Ashwin Highest Wicket Taker In World Test Championship : भारताचा अष्टपैलू खेळाडू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) यानं पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातली. दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन याने न्यूझीलंडला धक्यावर धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. यासह तो आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियन फिरकीपटूला मागे टाकत आर अश्विन ठरला नंबर वन!
टॉम लॅथम याच्या रुपात आर. अश्विन याने आपल्या पहिल्याच षटकात भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. विल यंग याच्या रुपात दुसरी विकेट खात्यावर जमा करताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी पोहचला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कुणाच्या खात्यात किती विकेट्स?
३९ सामन्यांत आर. अश्विन याने विल यंगच्या रुपात १८८ विकेट्सचा आकडा गाठत नॅथन लायनला मागे टाकले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनं ४३ कसोटींमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४२ सामन्यांत १७५ विकेट्स घेतल्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ३० सामन्यांतील १२४ विकेट्ससह या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणारा दुसरा गोलंदाज आहे अश्विन
आर. अश्विन हा भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. १०४ सामन्यात त्याने ५३० हून अधिक विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. अनिल कुंबळे या दिग्गजानंतर त्याचा नंबर लागतो. अनिल कुंबळे यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत २३६ सामन्यात ६१९ बळी टिपले आहेत. गोलंदाजीशिवाय शिवाय अश्विन फलंदाजीतही कमालीची कामगिरी करुन दाखवली आहे. त्याच्या खात्यात ६ शतकं आणि १४ अर्धशतकांसह ३४३८ धावांची नोंद आहे.
एक नजर कसोटीतल सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या रेकॉर्ड्सवर
- मुथय्या मुरलीधरन- २३० डावात ८०० बळी
- शेन वॉर्न- २७३ डावात ७०८ बळी
- अनिल कुंबळे - २३६ डावात ६१९ बळी
- आर. अश्विन -१९६ डावात ५३१ * बळी
- नॅथन लायन- २४२ डावात ५३०* बळी