Join us  

यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)

पुण्याच्या कोरड्या खेळपट्टीवर जादुई अंदाजात चेंडू वळवत त्याने किवींना रडवणारी गोलंदाजी केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 3:17 PM

Open in App

बंगळुरुच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघानं एक मोठा डाव खेळला. रणजी करंडक स्पर्धेत खेळत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला त्यांनी संघात सामील करुन घेतलं. एवढेच नाही तर पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाले. तीन वर्षांनी टीम इंडियात कमबॅकची मिळालेल्या संधीच त्यानं सोनं करून दाखवलं. पुण्याच्या कोरड्या खेळपट्टीवर जादुई अंदाजात चेंडू वळवत त्याने किवींना रडवणारी गोलंदाजी केली.  

वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी; शार्प टर्नसह रचिन रवींद्रला दिला चकवा

वॉशिंग्टनला दिलेली संधी योग्य की अयोग्य यावरुन चर्चा रंगत असताना युवा ऑफ स्पिनरनं आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून दिली. बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेल्या रचिन रवींद्रला त्याने आपल्या जाळ्यात अडकवलं. त्याने घेतलेली ही विकेट प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला घेण्याचा खेळलेला डाव यशस्वी ठरल्याचे चित्र निर्माण करणारे होते. रचिन रविंद्र अगदी सेट झाला होता. त्याला आउट करणं अशक्य वाटत असताना वॉशिंग्टन सुंदरनं शार्प टर्नसह त्याला चकवा देत क्लीन बोल्ड केले. रचिन रवींद्र ६५ धावांवर बाद झाला. 

चेंडू चौथ्या-पाचव्या स्टंपवर टाकून उडवला टॉमचा त्रिफळा 

रचिन रवींद्रची विकेट घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडचा विकेट किपर बॅटर टॉम ब्लंडेल याला आपल्या जाळ्यात अडकवले. वॉशिंग्टन सुंदर याने टॉम ब्लंडेलची विकेट घेण्यासाठी जो चेंडू टाकला होता तोही एकदम क्लास आणि त्याच्या फिरकीतील जादू दाखवणारा होता. जवळपास चौथ्या-पाचव्या स्टंपवर असलेला चेंडू  मारण्यासाठी न्यूझीलंडचा विकेट किपर बॅटर पुढे आला. पण चेंडूचा टप्पा पडल्यावर जे घडलं ते कमालच. चेंडू इतका वळला की, पॅड अन् बॅटमधील गॅपमधून तो थेट स्टंपवर आदळला.  

हे गडीही अडकले वॉशिंग्टनच्या जाळ्यात  

या दोघांशिवाय वॉशिंग्टन सुंदरनं पुण्याच्या मैदानातील कसोटी सामन्यात डॅरिल मिचेलच्या रुपात तिसरी विकेटही घेतली. ग्लेन फिलिप्सही त्याच्याच गळाला घावला. त्यामुळे त्याची ही कामगिरी प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या एन्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्यांची तोंडं बंद करायला लावणारी आहे. गोलंदाजीशिवाय तो फलंदाजीतही धमाका करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. साउदीच्या रुपात त्यानं पाचवी विकेटही घेतली. कसोटीतील त्याचा हा पहिली 'पंजा' आहे.

टॅग्स :वॉशिंग्टन सुंदरभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड