पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांत आटोपला आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर याच्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. या गोलंदाजाने ७ विकेट्स घेत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेल्या न्यूझीलंड संघाने पुणे कसोटी सामन्यात १०२ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा याने ४६ चंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली. जी भारतीय संघाकडून केलेली सर्वोच्च खेळी आहे.
टीम इंडियातील एकालाही गाठता आला नाही ४० या धावसंख्येचा आकडा
पुणे कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने १ बाद १६ धावांवरून खेळाला सुरुवात केली होती. शुबमन गिल ७२ चेंडूत ३० धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. पण कोहलीही फार काळ मैदानात टिकला नाही. तो ९ चेंडूत एका धावेवर बाद झाला. या दोघांना मिचेल सँटनरन तंबूचा रस्ता दाखवला. ६० चेंडूचा सामना करून ३० धावांवर खेळणाऱ्या यशस्वी जैस्वाल याला ग्लेन फिलिप्सनं माघारी धाडले. पुण्याच्या मैदानात पुन्हा रिषभ पंत आणि सर्फराजवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण यावेळी या दोघांचही काही चाललं नाही. पंत १९ चेंडूत १८ धावांची भर घालून चालता झाला. सर्फराजन दुहेरी आकडा गाठला. पण ११ धावांवर त्याचाही खेळ खल्लास झाला. वॉशिंग्टन सुंदरनं २१ चेंडूत नाबाद १८ धावांची खेळी आणि जडेजाच्या ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं कसा बसा दिडशेचा आकडा पार केला. आर अश्विन ४(५), आकाश दीप ६ (५) आणि जसप्रीत बुमराह ०(३) या तिघांनाही सँटनरनेच बाद केले. न्यूझीलंडकडून सँटनरशिवाय ग्लेन फिलिप्सनं ६ षटके गोलंदाजी करताना २ विकेट्स मिळवल्या. दुसरीकडे एवढीच षटके टाकणाऱ्या साउदीच्या खात्यात एक विकेट जमा झाली.