भारत विरुद्ध न्यूंझीलंड, दुसरी कसोटी : भारतीय गोलंदाजानं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडला बॅकफुटवर टाकले. त्यांचा निम्मा संघ 133 धावांवर माघारी पाठवल्यानंतर टीम इंडिया सामन्यात मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. पण, पुन्हा एकदा न्यूझीलंडचे शेपूट वळवळले. कायले जेमिसन आणि नील वॅगनर यांनी नवव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करताना टीम इंडियाचे मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताला पहिल्या डावात केवळ 7 धावांची आघाडी घेता आली.
दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताच्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी पाहायला मिळाली. तीन अर्धशतके झळकावल्यावरही भारताला 242 धावा करता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर बिनबाद 63 धावांपर्यंत मजल मारली होती. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी न्यूझीलंडला धक्के दिले. टॉम ब्लंडलला ( 30) उमेश यादवनं माघारी पाठवून टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनला ( 3) जसप्रीत बुमराहनं स्वस्थात माघारी पाठवले. रॉस टेलर ( 15), हेन्री निकोल्स ( 14) यांनी मोठी खेळी साकारता आली नाही. टॉम लॅथमने 52 धावा केल्या, पण त्याला शमीनं बाद केले. न्यूझीलंडचा निम्मा संघ 133 धावांवर माघारी परतल्यानंतर टीम इंडियाला सामन्यात मजबूत पकड घेण्याची संधी होती. पण, कॉलीन डी ग्रँडहोम ( 26), नील वॅगनर ( 21) आणि कायले जेमिसन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. वॅगनर आणि जेमिसन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. जेमिसनने 63 चेंडूंत 49 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं, परंतु त्यांना 7 धावांचीच आघाडी मिळाली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजानं 2 विकेट्स घेतल्या.