India vs New Zealand, 2nd Test Day 2 Stumps : पुणे कसोटी सामन्यावर न्यूझीलंडच्या संघाने आपली पकड अगदी मजबूत केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसातील सर्वच्या सर्व ३ सेशनमध्ये न्यूझीलंडचा बोलबाला दिसून आला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंडच्या संघाने ३०१ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर आता मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ ऐतिहासिक कामगिरीसह भारतीय मैदानात पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे.
पहिल्या डावात अवघ्या १५६ धावांत आटोपली टीम इंडिया
भारतीय संघाने १ बाद १६ धावांवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली होती. पण मिचेल सँटनरच्या फिरकीसमोर भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डर अक्षरश: ढेपाळली. जडेजाच्या ३८ धावा वगळता अन्य कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांत आोटपला. न्यूझीलंडकडून सँटनरनं ७ तर ग्लेन फिलिप्सनं २ आणि साउदीनं एक विकेट घेतली.
कॅप्टन लॅथमची बॅट तळपली, शतकं हुकले, पण...
पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा डेवॉन कॉन्वे १७ (१९) आणि रचिन रवींद्र ९ (१३) या दोघांना वॉशिंग्टन सुंदरनं अगदी स्वस्तात माघारी धाडले. आर अश्विन याने विल यंगलाही अवघ्या २३ धावांत तंबूचा रस्ता दाखवला. डॅरेल मिचेलही१८ धावांची भर घालून बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा कॅप्टन तग धरून उभा राहिला. बंगळुरु कसोटी सामन्यासह पुण्यातील सामन्यातील पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या टॉम लॅथमनं दुसऱ्या डावात १३३ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने ८६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याचे शतक हुकले असले तरी त्याच्या या खेळीनं संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे.
हातून निसटत असलेल्या सामन्यात टीम इंडिया कमबॅक करणार?
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाने ५ बाद १९८ धावा करत ३०१ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. एका बाजूला टॉम बंडेल ७० चेंडूंचा सामना करून ३० धावांवर नाबाद खेळत होता. दुसरीकडे ग्लेन फिलिप्सनं २९ चेंडू खेळ ९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ उर्वरित ५ विकेट्स लवकरात लवकर घेऊन हातून निसटत चाललेला सामना वाचवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: India vs New Zealand, 2nd Test Day 2 Stumps Tom Latham Fifty New Zealand lead by 301 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.