भारतीय संघावर सध्या करो किंवा मरो, अशी परिस्थिती आहे. कारण हा सामना गमावल्यास किंवा बरोबरीत राखल्यास त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. पण दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला क्रिकेटचा सराव करण्यापेक्षा भारतीय संघ कोणता तरी भलताच खेळ खेळत असल्याचे पाहायला मिळाले.
यश किंवा विजय मिळवण्यासाठी आपण कमी पडत असू, तर त्या गोष्टीचा सराव आपण जास्त करतो. त्यानुसार भारतीय संघाने क्रिकेटच्या सरावावर जास्त भर द्यायला हवा. पण सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ टर्बो टच, हा खेळ खेळताना दिसत होता.
भारतासाठी सध्या करो या मरो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण हा सामना भारताने जिंकला नाही तर भारताला ही मालिका गमवावी लागणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता भारताने हा सामना बरोबरीत सोडवला तरी त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी विजय आवश्यकच आहे.
हा टर्बो टच खेळ आहे तरी काय...या खेळामध्ये दोन संघ केले जातात. प्रत्येक खेळाडूला गोल करण्याची संधी दिली जाते. या खेळात एक लहान चेंडू वापरला जातो. हा चेंडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी दोन टच करण्यापूर्वी तुम्हाला गोल करायचा असतो. जर समोरच्या संघातील खेळाडूने तुम्ही गोल करताना तुम्हाला तीन टच केले तर तुम्हाला गोल करता येत नाही. या खेळाची माहितीही या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.
दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. यापूर्वी झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत इशांतला दुखापत झाली होती. त्यामुळे इशांतला काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण आता या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. इशांतच्या जागी संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इशांतबरोबरच भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला आहे. पृथ्वी शॉने गुरुवारी सराव सत्रातून माघार घेतली होती. त्याच्या डाव्या पायाला सूज आल्याने त्याने हा निर्णय घेतला आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. पृथ्वीबाबत शास्त्री यांनी एक मोठा खुलासा केला आहे.