भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचा किवी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटानं तर टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यात टीम इंडियाचे टेंशन वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एक जलदगती गोलंदाज सामील झाला आहे आणि त्याच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांनीही नांग्या टाकल्या होत्या. त्यामुळे मालिका वाचवण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणाऱ्या टीम इंडियासमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीनं दोन्ही डावांत मिळून 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याला पदार्पणवीर जेमिसन ( 4) आणि बोल्ट ( 5) यांची चांगली साथ लाभली होती. भारताला दोन डावांत अनुक्रमे 165 आणि 191 धावाच करता आल्या. न्यूझीलंडनं पहिल्या डावात 348 धावा करताना 183 धावांची आघाडी घेतली आणि टीम इंडियाला केवळ 9 धावांचे आव्हान ठेवता आले. न्यूझीलंडने एकही फलंदाज न गमावता अवघ्या 10 चेंडूंत हे लक्ष्य पार केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना 29 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात नील वॅगनरचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॅगनरने त्याच्या भेदक व आखूड माऱ्यानं वर्चस्व गाजवले होते. आता तो टीम इंडियाच्या फलंदाजांना सतावण्यासाठी सज्ज झाला आहे. पितृत्व रजेवर असल्यामुळे वॅगनरला पहिल्या कसोटीत खेळता आले नव्हते. मॅट हेन्रीच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या समावेशामुळे न्यूझीलंड संघासमोर पेच निर्माण झाला आहे. पदार्पणात धमाका उडवणारा जेमिसन किंवा वॅगनर अशा निवडीचा पेच कर्णधार केन विलियम्ससमोर उभा राहिला आहे.
प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की,''आमच्याकडे तगडा संघ निवडण्यासाठी चांगले पर्याय आहेत. नील वॅगनरचे पुनरागमन झाले आहे. त्याच्या समावेशामुळे संघाची ताकद वाढली आहे. कायले जेमिसननं पदार्पणातच छाप पाडली आहे.''