पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला अडचणीत आणले आहे. अवघ्या ८३ धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने १ बाद १६ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालही जोडी जमली होती. मिचेस सँटनरनं ही जोडी फोडली. धावफलकावर ५० धावा असताना शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. त्यानंतर ठराविक अंतराने टीम इंडियाने विकेट्स गमावल्या.
यशस्वी जैस्वाल अन् शुबमन गिलनं दुहेरी आकडा गाठला, पण...
पहिल्या दिवसाच्या खेळातच भारतीय संघाने रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावली होती. दुसऱ्या दिवशीच्या खेळात शुबमन गिलच्या विकेट्सह टीम इंडियाच्या विकेट्सची गळती सुरु झाली. शुबमन गिलनं २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७२ चेंडूत ३० धावा केल्या. दुहेरी आकडा गाठल्यावर ही खेळी मोठी करण्यात तो अपयशी ठरला. सँटनरन त्याला पायचित केले. यशस्वी जैस्वालही सेट झाल्यावर ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर एक साधा सोपा झेल देऊन माघारी फिरला. त्याने ६६ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३० धावा काढल्या. यशस्वी आणि शुबमन दोघांनी सेट झाल्यावर विकेट गमावली.
लंचआधी फक्त ९१ धावांत टीम इंडियाने गमावल्या ६ विकेट्स
भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्यावर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीनं थोडा वेळ घेतला. पण त्याचा खेळही ९ चेंडूतच खल्लास झाला. मिचेल सँटनरच्या फुलटॉस चेंडूवर त्याने विकेट गमावली. तो फक्त एका धावेची भर घालून तंबूत परतला. त्यानंतर सर्वांच्या नजरा या पंतवर होत्या. पण रिषभ पंतही नको त्या वेळी चुकीचा फटका मारून ग्लेन फिलिप्सच्या जाळ्यात फसला. त्याने १९ चेंडूत १८ धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या पडझडीच्या काळात सर्फराज खानचाही निभाव लागला नाही. तो २४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. रचिन रवींद्र ४ धावा करून आउट झाला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात लंच आधी भारतीय संघाने ९१ धावांत ६ विकेट्स गमावल्या.
आधी जलदगती गोलंदाजांसमोर टाकली होती नांगी, आता फिरकीच्या जाळ्यात फसले फलंदाज
बंगळुरु कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजी कोलमडली होती. त्यावेळी जलदगती गोलंदाजांसमोर टीम इंडियातील फलंदाजांनी नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले होते. बंगळुरुच्या तुलनेत पुण्यातील परिस्थितीत थोडी बरी असली तरी टीम इंडियाची अवस्था मात्र बिकटच आहे. पुण्याच्या मैदानातील टीम इंडियाच्या फ्लॉप शोमध्ये फरक फक्त एवढाच की, यावेळी न्यूझीलंडच्या फिरकीसमोर टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या ६ विकेट्समधील ४ विकेट्स मिचेल सँटनरनं तर २ विकेट्स ग्लेन फिलिप्सनं घेतल्या.