माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडमध्ये धोनीनंतर नेत्रदीपक कामगिरी करणारा तो भारताचा कर्णधार ठरला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सध्या सुरु असलेल्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने या मालिकेत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खिशात टाकली.
भारताला न्यूझीलंडमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2009 साली विजय मिळवता आला होता. त्यानंतर भारताला 2018पर्यंत एकही एकदिवसीय मालिका जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता थेट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवता आला आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर सहज मात केली. न्यूझीलंडवर मात करत भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आता यापुढे भारताला दोन्ही सामने गमवावे लागले तरी ही मालिका त्यांच्याच नावावर असेल.
न्यूझीलंडच्या 243 धावांचा पाठलाग भारताने फक्त तीन फलंदाज गमावत पूर्ण केला. रोहित शर्माने संयत फलंदाजी करताना तीन चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने 60 धावांची खेळी साकारली. अंबाती रायुडू (नाबाद 40) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 38) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.