माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यातही यजमान न्यूझीलंड संघाची कोंडी केली आहे. या संपूर्ण दौऱ्यात भारतीय गोलंदाजांचाच दबदबा राहिला आहे. तिसऱ्या वन डेतही न्यूझीलंडच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना केवळ 59 धावांवर माघारी पाठवण्यात गोलंदाजांना यश आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या धावगतीवरही चाप बसला आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या वन डेत पाहुण्यांचे पारडे जड मानले जात आहे. या निकालामुळे किवी संघ दहशतीत आहे आणि येथील पोलिसांनीही भारतीय खेळाडूंची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच भारतीय संघापासून सावध राहा, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भारताने नेपियर येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमानांवर 8 विकेट राखून विजय मिळवला होता. कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांच्या प्रभावी गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाज करताना संघाल विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचे 157 धावांचे लक्ष्य भारताने सहज पार केले. दुसऱ्या वन डेत शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 324 धावांचा डोंगर उभा केला. पुन्हा एकदा न्यूझीलंडला अपयश आले आणि त्यांचा संपूर्ण संघ 234 धावांवर माघारी परतला. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. 'विराट'सेनेच्या या कामगिरीची केवळ न्यूझीलंडच्या खेळाडूंनाच नव्हे तर तेथील पोलीस यंत्रणेतही घबराट पसरली आहे आणि त्यांनी नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.