इंदूर - तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडवर ९० धावांनी मात करत भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. या सामन्यात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी शतकी खेळी केल्या. तर न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे याने शतक ठोकले. या सामन्यात या तिघांखेरीज आणखी एका खेळाडूनेही शतक फटकावलं. मात्र त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.
या खेळाडूचं नाव आहे जेकब डफी. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याची भारताच्या फलंदाजांनी तुफान धुलाई केली. जेकबने या सामन्यात १० षटकांत १०० धावा देत तीन बळी टिपले. जेकबने विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवचे विकेट्स घेतले. मात्र तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर धावांची लयलूट केली.
संपूर्ण डावात स्वैर मारा करणाऱ्या जेकब डफीवर भारताच्या फलंदाजांनी जोरदार आक्रमण केले. त्याने टाकलेल्या १० षटकांमध्ये भारतीय फलंदाजांनी ७ षटकार आणि ९ चौकार ठोकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात १०० हून अधिक धावा देणारा डफी हा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम टिम साऊदीच्या नावे आहे. त्याने २००९ मध्ये झालेल्या सामन्यात १०५ धावा दिल्या होत्या.
२८ वर्षीय डफीने न्यूझीलंडसाटी तीन एकदिवसीय सामन्यात सात बळी टिपले आहेत. तर त्याने आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ बळी टिपले आहेत.