माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : शिखर धवनच्या झटपट सुरुवातीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी करताना आपल्या नावावर विक्रम नोंदवला. भारताकडून शतकी भागीदारी करणाऱ्या फलंदाजांमधील अव्वल स्थानाकडे या दोघांनी कूच केली आहे. यासह त्यांनी ऑस्ट्रेलियाची दिग्गज सलामीची जोडी मॅथ्यू हेडन व अॅडम गिलख्रिस्ट यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली.
नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही न्यूझीलंडला तिसऱ्या वन डे सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यांचा संपूर्ण संघ 243 धावांत तंबूत परतला. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनने आक्रमक खेळ केला, परंतु धावफलकावर 39 धावा असताना तो माघारी परतला. त्यानंतर रोहित व कोहलीने भारताला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावा जोडल्या. रोहित व कोहली यांनी अनुक्रमे 39 व 49 वे वन डे अर्धशतक पुर्ण केले.
रोहितने 77 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 62 धावा केल्या. कोहलीने 63 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहित बाद झाल्यानंतर कोहलीने फटकेबाजी सुरू केली. पण, त्याची वादळी खेळी 32व्या षटकात संपुष्टात आली. कोहलीने 74 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 60 धावा केल्या. या जोडीचे ही वन डे क्रिकेटमधील 16वी शतकी भागीदारी ठरली. त्यांनी या कामगिरीसह ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन यांच्या 16 शतकी भागीदारींच्या विक्रमाशी बरोबरी केली.
Web Title: India vs New Zealand 3rd ODI: Virat kohli and Rohit sharma equal most 100 plus stand in ODIs record with Adam Gilchrist and Matthew Hayden
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.