हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी -20 मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवामुळे भारताची सलग 10 ट्वेंटी-20 मालिकेतील अपराजित मालिका खंडित झाली. भारताचा हा पराभव पाकिस्तान संघाच्या पथ्यावर पडला. भारताच्या मालिका पराभवामुळे पाकिस्तानचा विश्वविक्रम अबाधित राहिला. कॉलीन मुन्रो ( 72 ) आणि टीम सेइफर्ट ( 43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम सोपे केले. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूंत 30 धावा केल्या. किवींनी 20 षटकातं 4 बाद 212 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात भारताकडून विजय शंकर ( 43), रोहित शर्मा ( 38), दिनेश कार्तिक ( 33*) व कृणाल पांड्या ( 26*) यांनी उत्तम खेळ केला. पण, भारताला विजय मिळवण्यात अपयश आले.2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर पाकिस्तानने सलग 11 मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने सलग 11 ट्वेंटी-20 मालिका जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यांना ट्वेंटी-20 मालिकेत 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांची विजयी घोडदौड रोखली. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानच्या या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी होती. भारताने मागील 10 ट्वेंटी-20 मालिकेत अपराजित्व राखले आहे. जुलै 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर भारताने श्रीलंका (1-0), ऑस्ट्रेलिया ( 1-1), न्यूझीलंड ( 2-1), श्रीलंका ( 3-0), दक्षिण आफ्रिका ( 2-1), निदाहास तिरंगी मालिका, आयर्लंड ( 2-0), इंग्लंड ( 2-1), वेस्ट इंडिज ( 3-0) आणि ऑस्ट्रेलिया (1-1) या ट्वेंटी-20 मालिकेत अपराजित्व राखले होते. मात्र, आजच्या पराभवाने भारताची अपराजित मालिका खंडित झाली.