हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : ऑकलंड येथील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या कृणाल पांड्याने रविवारी स्वतःच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला. दुसऱ्या सामन्यात 28 धावांत 3 विकेट घेणाऱ्या कृणालने तिसऱ्या सामन्यात चार षटकांत बिनबाद 54 धावा दिल्या. या कामगिरीमुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आणि त्याने भाऊ हार्दिकलाही मागे टाकले.
कॉलीन मुन्रो ( 72 ) आणि टीम सेइफर्ट ( 43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम सोपे केले. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर किवीच्या अन्य फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आणि भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूंत 30 धावा केल्या. किवींनी 20 षटकातं 4 बाद 212 धावा चोपल्या.
हार्दिकने या मालिकेत ( 51+36+44) एकूण 131 धावा दिल्या. ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय गोलंदाजांची ही सर्वात लाजीरवाणी कामगिरी ठरली. त्यापाठोपाठ कृणालने 119 धावा दिल्या आहेत. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यांत सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम कृणालच्या नावावर आज नोंदवला गेला. त्याने मोहम्मद सिराजचा 53 ( 2017) धावांचा आणि हार्दिकचा 51 ( 2019) धावांचा विक्रम मोडला.
ट्वेंटी-20 सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल आघाडीवर आहे. त्याने 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 64 धावा दिल्या होत्या. त्यानंतर जोगींदर शर्मा ( 57 धावा वि. इंग्लंड, 2007) याचा क्रमांक येतो. या विक्रमात कृणाल ( 55 धावा वि. ऑस्ट्रेलिया, 2018) याचा क्रमांक येतो.