हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसरा ट्वेंटी-20 सामना जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. भारताच्या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली असून रविवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघ मालिका विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची शक्यता आहे. हॅमिल्टन येथे होणाऱ्या सामन्यात भारतीय संघात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे.
मागील तीन महिने भारतीय संघासाठी संस्मरणीय राहिले आहेत. ऑस्ट्रेलियात 70 वर्षांत प्रथमच कसोटी मालिका विजय, वन डे मालिकेत सरशी, त्यानंतर न्यूझीलंडमध्ये दहा वर्षांनंतर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. आता भारताला न्यूझीलंडमध्ये पहिला ट्वेंटी-20 मालिका विजय मिळवण्याचा विक्रम खुणावत आहे. भारतीय संघाने शुक्रवारी मिळवलेला विजय हा न्यूझीलंडविरुद्धचा त्यांच्याच घरच्या मैदानावरील 10 वर्षांतील पहिलाच ट्वेंटी-20 विजय ठरला.
भारतीय संघ पहिल्या दोन्ही सामन्यात एकाच संघासह मैदानात उतरला होता. पण, तिसऱ्या सामन्यात संघात काही बदल अपेक्षित आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलला दोन्ही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे, अर्थात संघ व्यवस्थापन अंतिम निर्णय घेतील. त्याशिवाय अष्टपैलू विजय शंकरच्या जागी केदार जाधव अंतिम अकरामध्ये स्थान पटकावू शकतो. कृणाल पांड्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे. त्यामुळे त्याचे स्थान पक्के आहे. जलदगती गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार व खलील अहमद हेच कायम राहतील.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, विजय शंकर/केदार जाधव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार.
Web Title: India vs New Zealand 3rd T20 : Kuldeep Yadav in for Yuzvendra Chahal? India's predicted playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.