India vs New Zealand, 3rd Test Day 1 Stumps : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही भारतीय़ संघाच्या बॅटिंगचा फ्लॉप सिलसिला कायम राहिल्याचे दिसून आले. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाने पहिल्या दिवशीच आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली.
पहिल्या दिवसाअखेर भारत पहिला डाव ४ बाद ८६ धावा
पण पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने फक्त ८६ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा १८(१८), यशस्वी जैस्वाल ३० (५२), मोहम्मद सिराज ०(१) आणि विराट कोहली ४(६) ही चौघे तंबूत परतली आहेत. खेळं संपला त्यावेळी शुबमन गिल ३८ चेंडूत नाबाद ३१ धावांवर तर रिषभ पंत एका चेंडूत एक धाव काढून नाबाद परतला. दुसऱ्या दिवशी या जोडीवर भारतीय संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी असेल.
गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली, पण फंलदाजांनी पुन्हा गडबड केली
न्यूझीलंड विरुद्धची ३ सामन्यांची मालिका टीम इंडियानं आधीच गमावली आहे. पण तिसरा आणि अखेरचा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा प्रवास निश्चित करण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. बंगळुरु आणि पुण्याच्या मैदानातील पराभवालाही भारतीय फलंदाजीतील ढिसाळपणाच कारणीभूत होता. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात टीम इंडिया सर्व चुका भरून काढेल, अशी चाहत्यांना आशा आहे. गोलंदाजांनी आपली जबाबादारी चोख पार पाडत न्यूझीलंडच्या संघाला २३५ धावांत रोखले. पण या धावाही टीम इंडियाच्या मजबूत फलंदाजीला आता खूप वाटत आहे.
भारतीय संघानं कशा गमावल्या विकेट्स?
न्यूझीलंड संघाचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यावर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्माला या सामन्यात दोन वेळा जीवनदान मिळाली. पण याचा फायदा त्याला उठवता आला नाही. भारतीय संघाच्या धावफलकावर २५ धावा असताना मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर तो स्लिपमध्ये झेल देऊन तंबूत परतला. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल जोडीन अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण धावफलकावर ७८ धावा लागल्या असताना अजाज पटेलनं यशस्वीला बोल्ड केले. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का होता. नाईट व़ॉचमनच्या रुपात टीम इंडियाने मोहम्मद सिराजला बॅटिंगला पाठवलं. पण एजाज पेटेलनं त्याला खातेही उघडू दिले नाही. मग शेवटी विराट कोहली मैदानात आला. त्याने एक चौकारही मारला पण मॅट हेन्रीनं डायरेक्ट थ्रोवर रन आउट करत त्याचा खेळ खल्लास केला.